सासष्टी : मडगाव येथील जुन्या बाजारातील कोलवा वाहतूक बेटाजवळ मिकी पाशेको प्रा. जमावाने सुभाष वेलिंगकर यांच्या विरोधात पुकारलेल्या आंदोलनात माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी सहभागी होऊन आंदोलनाला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी दाखल केलेल्या खटल्यातून दोषमुक्तता मिळवण्यासाठी सादर केलेला पाशेको यांचा अर्ज मडगावच्या मुख्य न्यायदंडाधिकारी शुभदा दळवी यांनी अमान्य केला आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या खटल्यात तथ्य असण्याची शक्यता असल्याने न्यायालयाने येत्या ५ फेब्रुवारी रोजी आरोप निश्चितीपूर्व सुनावणी ठेवली आहे. या सुनावणीच्या वेळी आरोप निश्चित करण्यापूर्वी संशयिताचे म्हणणे ऐकून घेतले जाईल, असे न्याय दंडाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
सहायक सरकारी वकील सॅनफोर्ड फर्नांडिस यांनी युक्तिवाद करताना असे नमूद केले की, आरोप निश्चितीच्या टप्प्यावर न्यायालयाने केवळ प्रथमदर्शनी गुन्हा घडला आहे की नाही हे पाहणे आवश्यक आहे. पुरवणी जबाबात, तक्रारदाराने संशयिताला आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता, असे नमूद केले आहे. पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण व इतरांसह साक्षीदारांच्या जबावांमध्येही आरोपीची ओळख पटवली आहे. सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्यमानत न्यायालयाने पाशेको यांचा दोषमुक्तीची मागणी फेटाळून लावली.