पणजी प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांना भाजपमध्ये फेरप्रवेश देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मंत्री विश्वजीत राणे, सहप्रभारी अनिल अँटोनी, सचिव दयानंद सोपटे. (छाया : समीर नार्वेकर) 
गोवा

Former Goa CM Laxmikant Parsekar rejoins BJP - माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर स्वगृही परतले

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर स्वगृही परतले

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला. कदंब पठारावरील भाजप मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी प्रा. पार्सेकर यांच्यासह त्यांच्यासोबत आलेल्या अनेक कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, भाजपचे सहप्रभारी अनिल अँटोनी आणि सचिव दयानंद सोपटे व्यासपीठावर उपस्थित होते.

२०१७ विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री असतानाही प्रा. पार्सेकर यांना मांद्रे मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मांद्रे मतदारसंघातून माजी आमदार दयानंद सोपटे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या प्रा. पार्सेकर यांनी भाजपचा त्याग करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यांच्या उमेदवारीमुळे भाजपचे उमेदवार दयानंद सोपटे यांचा पराभव झाला, तर मगो पक्षाचे जीत आरोलकर विजयी झाले. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्वांचे स्वागत केले. भाजप मजबूत करणे आणि आगामी निवडणुका जिंकणे हे पक्षाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

पक्ष जी जबाबदारी देईल ती आपण पार पाडू. पक्षापासून दुरावलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी प्रयत्न करणार. आपल्यासोबत पक्षापासून दूर गेलेल्या कार्यकर्त्यांनी अन्य कोणत्याही पक्षात प्रवेश केला नव्हता, याचे समाधान असल्याचेही पार्सेकर यांनी नमूद केले.

३० जागा जिंकण्याचे लक्ष्य : मुख्यमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी भाजपच्या प्रत्येक नेत्याने आणि कार्यकर्त्याने काम करणे आवश्यक आहे. प्रा. पार्सेकर यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजप अधिक मजबूत होईल आणि त्यांच्या अनुभवाचा व मार्गदर्शनाचा लाभ कार्यकर्त्यांना मिळेल. राज्यासह मांद्रे मतदारसंघातही भाजपचे कमळ फुलेल. आगामी विधानसभा निवडणुकीत ३० जागा जिंकण्याचे पक्षाचे व आपले लक्ष्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT