डिचोली : मये मतदारसंघातील वन म्हावळिंगे-कुडचिरे पंचायत क्षेत्रातील वन गावात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सोमवारी डिचोली मामलेदार, तलाठी हे पोलिस पथकासह काही ठिकाणी घरांच्या सर्वेक्षणासाठी आली होती. त्यांना सर्वेक्षण करण्यास ग्रामस्थांनी विरोध केला. अधिकारी सर्वेक्षणासाठी येणार असल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ लगेच एकजूट झाले. आकस्मिकपणे सर्वेक्षणास आलेल्या अधिकार्यांना त्यांनी जाब विचारला व भू-सर्वेक्षणास विरोध करून त्यांना परतावून लावले.
कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना किंवा नोटीस न देता अचानक त्या ठिकाणी व सर्वेक्षणासंदर्भात माहिती घेण्यासाठी अधिकारी आल्याने तेथील ग्रामस्थ भांबावले. त्यांनी तातडीने संपूर्ण गाव एकत्र करून अधिकार्यांना सर्वेक्षण करण्यास रोखले यावेळी मामलेदार दत्त प्रसाद तोरस्कर यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, हे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती दिली. मात्र त्याला ग्रामस्थांनी विरोध केला. मात्र कोणत्याही प्रकारे नोटीस किंवा पूर्वकल्पना न देता अशाप्रकारे सर्वेक्षण कसे काय करू शकता, असे ग्रामस्थांनी प्रश्न विचारले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तही उपस्थित होता. बराच वेळ चर्चा चालू असताना आमदार प्रेमेंद्र शेट घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला व आपण कायदेशीर सल्ला घेण्यासाठी वकील नियुक्त करून या प्रकरणी पूर्णपणे ग्रामस्थांच्या बाजूने राहण्याची हमी दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले.
उच्च न्यायालयात या संदर्भात, कोणीतरी याचिका दाखल केल्याने त्या संदर्भात, मामलेदारांना या बेकायदा घरांच्या बांधकामांसंदर्भात कारवाई केलेली नाही. त्याबाबत उच्च न्यायालयात माहिती दिल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार मामलेदारांनी सर्वेक्षणासंदर्भात चौकशीसाठी पथक पाठवले होते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यासंदर्भात, 13 ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयात सुनावणी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मात्र ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र जमले व त्यांनी या भू-सर्वेक्षणाला पूर्णपणे विरोध दर्शवला.
पंचायत सदस्य तुळशीदास बुगडे यांना विचारले असता, पूर्वसूचना न देता ग्रामस्थांना सर्वेक्षणास सुरुवात करण्यासंदर्भात विचारणा करण्यात आल्याने लोक भांबावले. अनेक वर्षे लोक या ठिकाणी राहत असून या ठिकाणी अशाप्रकारे पूर्वसूचना न देता सर्वेक्षणासंदर्भात, मामलेदार व अधिकार्यांच्या पथकाने पाठपुरावा केल्याने सारे लोक एकत्र झाले व त्यांनी या सर्व गोष्टींना विरोध केल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार शेट यांनी कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कृती करण्याची हमी दिल्याने कायद्याबाबत जर आमदार सहकार्य करून ग्रामस्थांना न्याय देत असतील तर आम्ही ग्रामस्थांबरोबर आहोत तसेच ग्रामस्थांचा प्रश्न सोडवणे महत्त्वाचे आहे, असे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. दरम्यान, काँग्रेसचे अजय प्रभू गावकर तसेच गोवा फॉरवर्डचे संतोष कुमार सावंत यांनीही वन गावात भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली.
आमदार प्रेमेंद्र शेट म्हणाले, आम्हाला सहकार्य करताना कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कृती करण्यासंदर्भात सुचवले आहे. या संदर्भात, आमदार शेट यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून ग्रामस्थांच्या आपण पूर्णपणे पाठिशी असल्याचे सांगितले.