पणजी : राज्यात मागील काही दिवसांपासून वन्य प्राण्यांबाबत अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याच्या कारणाने वनमंत्री विश्वजित राणे आक्रमक झाले आहेत.
राज्यातील अकार्यक्षम वन अधिकार्यांवर तीव्र शब्दांत टीका करत त्यांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली. सांगे येथील जखमी बिबट्या बोंडलामध्ये मृत्युमुखी पडला, तर कोने-प्रियोळ येथे वाहनाला धडकलेल्या ब्लॅक पँथरलाही वाचवण्यात अपयश आल्याने मंत्री राणे अधिकार्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज झाले आहेत. याप्रकरणी वनसंरक्षक नवीनकुमार यांना पदमुक्त करण्याचा आदेश त्यांनी काढला आहे.
मंत्री राणे यांनी म्हटले आहे की, काही अधिकार्यांनी बोंडला प्राणीसंग्रहालयाला भेट न देणे आणि जखमी बिबट्याची काळजी घेण्यात असमर्थता दाखवणे, हे त्यांच्या अकार्यक्षमतेचे स्पष्ट उदाहरण आहे. अशा निष्क्रिय अधिकार्यांना गोव्यात ठेवण्याची गरज नाही. गोव्याचे हित आणि वन्यजीव संवर्धन हे सरकारचे प्राधान्य आहे. या दिशेने सकारात्मक काम करणार्या अधिकार्यांची आवश्यकता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मंत्री राणे यांनी एपीसीसीएफ प्रवीण राघव आणि पीसीसीएफ यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत, त्यांचा सक्रिय दृष्टिकोन इतरांसाठी आदर्श असल्याचे सांगितले आहे.