गोवा

गोव्यातील राखीव वन क्षेत्रातील धबधबे पर्यटकांसाठी बंद | Goa Waterfalls

backup backup

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : म्हापसा येथील जनार्दन सडेकर आणि कुडचडे येथील शिवदत्त नाईक यांच्या मृत्यू नंतर नेत्रावळी राखीव वन क्षेत्रातील मैनापीसह सावरी, खोतीगाव राखीव वन क्षेत्रातील पाली आणि कुस्के हे चार धबधबे पर्यटकांसाठी तात्पुरते बंद करण्याचा निर्णय वन खात्याने घेतला आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून ती बंदी कायमची असावी यावर वनखाते विचार करत आहे. पर्यटकांच्या उच्छादामुळे गोमंतकीयांवर वर्षापर्यटनाला कायमचे मुकावे लागणार आहे. दोघा जणांच्या मृत्यूमुळे नेत्रावळीतील धबधबे प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. दोघा जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या मैनापी धबधब्यावर यापूर्वी अनेकदा जीवघेण्या दुर्घटना घडलेल्या आहेत.

रविवारी दोन पर्यटकांच्या मृत्यूने खळबळ

रविवारी (दि. ९) शेकडोंच्या संख्येने देशी पर्यटक मैनापीत दाखल झाले होते. सुरक्षा रक्षकाच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष करून दोघेही पाण्यात गेले आणि मृत्यूमुखी पडले. मैनापीवर जाण्यासाठी सुमारे दीड तासांची पायपीट करावी लागते. आता पर्यटकांसाठी पायर्‍यांचीही सोय करण्यात आली आहे. मद्यपान करण्यास तिथे मनाई असली तरीही लोक शीतपेयाच्या बाटलीत दारू भरून त्याठिकाणी आणतात. सावरी धबधब्यावर तर दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. शंभर रुपये शुल्क भरून पर्यटक राखीव वनक्षेत्रात प्रवेश करतात. मद्याच्या नशेत सुरक्षा रक्षकांच्या सूचना ते ऐकत नाहीत. एकाच बरोबर चारशे पाचशे पर्यटकांना हाताळणे एका सुरक्षा रक्षकाला शक्य होत नाही. मैनापीच्या धबधब्यात ते दोघेही बुडण्यापूर्वी सुरक्षा रक्षकाने त्यांना सूचित केले होते, अशी माहिती समोर आली आहे.

दहा वर्षांपूर्वी मैनापित सहलीसाठी आलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गटातील एकाचा बुडून मृत्यू झाला. त्याचवेळी मधमाश्यांनी बचावासाठी लोकांवर हल्लाही केला होता. त्यानंतर पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला होण्याचा प्रकार अनेकदा घडला होता. त्यामुळे मैनापीवर जाणार्‍या लोकांना वनखात्याकडून सूचना केल्या जातात.

मैनापीचे लोकांना फार आकर्षण आहे. पण मैनापीत जाण्यासाठी जंगलातील सुमारे दीड तासांची पायपीट करावी लागत असल्याने लोक सावरी धबधब्याला पसंती देतात. पण रविवारच्या घटनेनंतर सावरी धबधबासुद्धा पर्यटकांसाठी बंद झाला आहे. राखीव वनक्षेत्रातील खोतीगावच्या बामणबुडो धबधब्यावरही वन खाते निर्बंध आणण्याच्या प्रयत्नांत असल्याचे समजते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT