फोंडा : पुढारी वृत्तसेवा
वारखंडे फोंडा येथील ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार झाली तर तिचा सात वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात रविवारी संध्याकाळी ४.३० वाजता घडला.
अपघात झाल्यानंतर संतप्त जमावाने ट्रकची तोडफोड करून बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या मशिनला आग लावली. वारखंडे भागात एका मेगा प्रकल्पाचे काम सुरु असून तेथील मातीची वाहतूक या ट्रकमधून (जीए ०८ यू ०८१२) केली जात होती.
हा ट्रक माती भरण्यासाठी प्रकल्पस्थळी जात असताना वारखंडे तिठ्यावर वरच्या बाजूच्या रस्त्याने येणाऱ्या जीए ०५ व्ही १५९७ या क्रमांकाच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. या धडकेत दुचाकीस्वार महिला स्वाती अंकुश राठोड (वय ३२, मूळ रा. बीड, महाराष्ट्र व सध्यारा. फोंडा) व दुचाकीवरील तिचा सात वर्षीय मुलगा आयुष राठोड हा रस्त्यावर फेकले गेले.
डोक्याला गंभीर इजा झाल्याने स्वाती राठोड हिचा इस्पितळात नेताना मृत्यू झाला तर जखमी आयुष याला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघात होऊन पोलिस घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने संतप्त जमावाने वाहतूक रोखून धरली आणि अपघातग्रस्त ट्रकची तोडफोड केली. त्यासोबतच जेथे प्रकल्पाचे काम सुरू होते तेथे जाऊन मशिनरीला आग लावली. तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला.
अवजड वाहनांना बंदी...
हा रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंद आहे तरीही वाहतूक होत असल्याने स्थानिकांनी आधीच रोष प्रकट केला होता. शेवटी संतप्त जमावाची समजूत पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी काढली आणि मयत महिलेला बिल्डरकडून नुकसान भरपाई देण्याबरोबर तिठ्यावर वाहतूक पोलिस नेमणे तसेच अवजड वाहनांना प्रवेश बंदी करणे यासह इतर मागण्या मान्य केल्या. फोंडा पोलिसांनी पंचनामा केला.
पोलिसांच्या विलंबाची चौकशी होणार...
वारखंड येथे झालेल्या अपघाताच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी पोलिसांना दीड तासाहून अधिक वेळ लागला. विलंबाबद्दल विचारले असता, एसपी टिकम सिंग वर्मा म्हणाले, "पोलिस उशिरा का पोहोचले याची मी चौकशी करेन, असे सांगितले.