पणजी : धार्मिक भावना दुखावणारे आक्षेपार्ह विधान करणार्या गौतम खट्टर याला तत्काळ अटक करावी आणि खट्टर यांच्या वक्तव्याचे पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी समर्थन केल्याचा दावा करत त्यांच्यावरही एफआयआर दाखल करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने केली. आलेमाव यांनी इतर पदाधिकार्यांसह गोव्याचे पोलिस महासंचालक आलोक कुमार यांची भेट घेतली. यावेळी खासदार विरिएतो फर्नांडिस, आमदार एल्टन डिकॉस्टा, काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर आणि तुलिओ डिसोझा, काँग्रेस नेते समील वळवईकर, डॉ. केतन भाटीकर, अमित पालेकर, उत्तर जिल्हाध्यक्ष शशांक नार्वेकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष असिज नोरोन्हा आदी उपस्थित होते.
18 एप्रिल रोजी दक्षिण गोव्यातील खारेवाडो येथील टिळक मैदानावर भगवान परशुराम जन्मोत्सव कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात गौतम खट्टर वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले. ही माहिती समजताच संपूर्ण गोव्यात संतापाची लाट उसळली.
ख्रिस्ती बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत अनेक पोलिस स्थानकांत गौतम खट्टर यांच्याविरोधात एफआरआर नोंदवा अशी मागणी करत आंदोलक जमा झाले. 19 एप्रिल रोजी रात्री उशिरा एफआयआर नोंदवण्यात आला. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलम 299 आणि 196 अंतर्गत अजामीनपात्र गुन्हा नोंदवला आहे.
दुसरीकडे, आयोजकांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल वापरलेले शब्द दुर्दैवी असून, वक्त्याने असे बोलणे सुरू करताच त्याला थांबवण्यात आले होते, असा दावा करत ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यांची आयोजकांनी माफी मागितली आहे.