Finally, today, on Friday night, Omkar the elephant and his mother were reunited.
पणजी : प्रभाकर धुरी
अखेर आज, शुक्रवारी रात्री ओंकार हत्ती आणि त्याच्या आईची पुनर्भेट झाली. त्याची आई, छोटी मादी, दोन पिल्ले आणि गणेश यांची मेढे धरणाजवळ भेट झाली. रात्री १० वा. या सुमारास सहाही हत्तींचा कळप एकत्र आला. त्यानंतर १०.३७ वा. सहाही हत्ती मेढे धरणात दिसले. गोव्यात दोनवेळा आलेला ओंकार हत्ती सीमेवरील सिंधुदुर्गात परतला.
गोव्यातील शेतकऱ्यांनी त्यामुळे सुटकेचा निःश्वास सोडला होता. गोव्यातून सावंतवाडी तालुक्यातील डोंगरपालमधून दोडामार्ग तालुक्यात गेलेला ओंकार गेले दोन दिवस घोटगे आणि घोटगेवाडीत मुक्कामाला होता. तो आज, शुक्रवारी पाळ्ये, मेढे येथे त्याच्यावर जीव लावणाऱ्या गावकऱ्यांच्या प्रेमाच्या वर्षावात न्हात जन्मभूमीकडे गेला. तेरवण मेढे येथील श्री नागनाथ मंदिराजवळून पुढे गेलेला ओंकार रात्री संदीप कोरगावकर यांच्या घराच्या मागच्या बाजूला शांत झोपला होता. तत्पूर्वी तो श्री नागनाथ मंदिराजवळ बांधलेल्या कॉजवेच्या खालच्या भागात पाणी प्यायला.
तसेच गावकऱ्यांनी त्याला पुलाखालील पाण्यात मस्त आंघोळही घातली. यावेळी तो शांतपणे आंघोळीचा आनंद घेत होता. त्याच्या या आंघोळीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून पाळीव हत्तीला जशी आंघोळ घालतात, तशी या माणसाळलेल्या जंगली हत्तीला आंघोळ घालत असणाऱ्या लोकांचे कौतुकही केले जात आहे. ओंकारने घोटगेवाडीतून पाळये, मेढे, हेवाळेकडे प्रवास केला. या प्रवासात गावकऱ्यांकडून त्याचे स्वागत झाले. अनेकांनी त्याला केळी, अननस, चारा खायला दिला. वाटेत काहींनी पिण्यासाठी पाणीही दिले. त्याची आणि त्याच्या आईची भेट व्हावी म्हणून अनेक ओंकारप्रेमी, पर्यावरणप्रेमी, गावकरी त्याला पुढे पुढे कळपाच्या दिशेने घेऊन गेले.
त्यांचा आनंद गगनात मावेना..
ओंकारचा जन्म हेवाळे परिसरात झाला होता. आता तो जिथे झोपला आहे, तिथून दोडामार्ग - कोल्हापूर बेळगाव हा आंतरराज्यमार्ग जातो. त्याच्या पलीकडे अननसाची बाग होती. त्या बागेत ओंकार आणि बाहुबली (ओंकारचा पिता) एकत्र फिरतानाचा व्हीडीओ व्हायरल झाला होता. त्याच परिसरात रस्त्याच्या अलीकडे ओंकार झोपला आहे. त्याने आज दिवसभरात १०-१५ किलोमीटरचा प्रवास केला. आता तो त्या कळपाजवळ पोचला आहे. त्याचवेळी घाटीवडे बांबर्डे परिसरात गेले अनेक दिवस ठाण मांडून बसलेला गणेश, ओंकारची आई, छोटी मादी, दोन पिल्ले रात्री ९.२७ वा.च्या सुमारास मेढेच्या दिशेने आली आणि अखेर त्यांची भेट झाली. हा क्षण त्या सर्वांसाठी नक्कीच आनंददायी असेल. पण, त्यांची भेट घडवण्यासाठी ज्या लोकांनी प्रयत्न केले, त्यांचा आनंदही गगनात मावेनासा झाला होता.
ओंकार प्रेमींकडून जल्लोष
ओंकार प्रेमी, पर्यावरणवादी आणि सिंधुदुर्ग व गोव्यातील अनेकांनी ओंकार आणि कळपाची भेट झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आईपासून अलग झालेल्या ओंकारची आणि त्याच्या आईची भेट व्हावी अशी अनेकांची मनोमन इच्छा होती, अखेर आज, शुक्रवारी रात्री ती पूर्ण झाली