खाद्य व्यवसायासाठी परवाना बंधनकारक आहे. (file photo)
गोवा

FDA Action Goa | कोलवा किनारी 'एफडीए'ची धडक कारवाई! 14 विक्रेत्यांना नोटीस, सुरावलीत 18 हजारांचा दंड वसूल

FDA Action Goa | अन्न व औषध प्रशासनाची कारवाई : मडगावातील खाणावळ बंद

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

सासष्टीतील अन्न व औषध खात्याच्या पथकाने कोलवा, सुरावलीत स्टॉल्स, आस्थापनांची पडताळणी केली. कोलवा किनारी आरोग्य कार्ड नसणे, अस्वच्छता यासाठी १४ विक्रेत्यांना नोटीस बजावल्या, तर सुरावलीत खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करत १८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय मडगावातील एका खानावळीत पाहणी करत ते बंद करण्याचे निर्देश देण्यात आले.

राज्यातील जनतेला सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्न मिळावे या उद्देशाने अन्न व औषध प्रशासनाने कोलवा समुद्रकिनारी भागात आणि सुरावली परिसरात सोमवारी सायंकाळी उशिरा मोहीम राबवली. या तपासणी दरम्यान स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या विक्रेते, खाद्यपदार्थाचे गाडे आणि उपाहारगृहांवर कडक कारवाई करण्यात आली आहे.

कोलवा समुद्रकिनाऱ्यावर करण्यात आलेल्या तपासणीत १४ विक्रेत्यांच्या कामात त्रुटी आढळल्या. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य कार्ड नसणे, परिसरात अस्वच्छता, विक्रेत्यांचा अस्वच्छ पेहराव, कचराकुंडीवर झाकण नसणे आणि धूम्रपान निषेध फलकांचा अभाव अशा बाबी समोर आल्या. या सर्व विक्रेत्यांना नोटीस जारी करत सुधारणा करण्यास सांगण्यात आले.

दरम्यान, परिसरातील आइस्क्रीम गाड्यांचीही तपासणी केली असता, त्यात स्वच्छतेचे नियम पाळले जात असल्याचे दिसून आले. सुरावलीत खाद्यपदार्थ विक्रेत्यांना दह सुरावली भागात वारंवार सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर अन्न व औषध विभागाने १८ हजारांचा दंड ठोठावला. याशिवाय एका किरकोळ विक्रेत्यालाही दोन हजारांचा दंड करण्यात आला. याठिकाणी स्वच्छतेचा अभाव, अन्नाची अयोग्य हाताळणी आणि कीड नियंत्रणाचा अभाव अशा गंभीर त्रुटी आढळल्या.

सुधारण्यासाठी पाच दिवसांची मुदत

अन्न व औषध विभागाने ज्या विक्रेत्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे, त्यांना त्रुटी सुधारण्यासाठी ५ दिवसांची मुदत दिली. राज्यातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी आणि अन्नाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी यापुढेही अशी देखरेख आणि अंमलबजावणी सुरू राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

मडगावातील रेस्टॉरंट बंद करण्याचे निर्देश

मडगाव येथील खारेबांध परिसरात अन्न व औषध विभागाच्या पथकाने बक्षी या रेस्टॉरंटवर कारवाई केली. या रेस्टॉरंटला यापूर्वीच्या पाहणी वेळी सुधारणेच्या सूचना केलेल्या होत्या व २० हजारांचा दंड ठोठावला होता. त्यांनी दंडही भरला नाही व अस्वच्छतेबाबत सुधारणाही केल्या नाहीत. त्यामुळे यावेळी रेस्टॉरंट बंद करण्याचे निर्देश पथकाकडून देण्यात आलेले आहेत. सुधारणा केल्याशिवाय आस्थापन सुरू करण्यास मनाई केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT