Mobile  
गोवा

Fake RTO E-Challan APK | बनावट आरटीओ ई-चलनाच्या एपीके फाईलपासून सावध राहा

Fake RTO E-Challan APK | बनावट आरटीओ ई-चलनाच्या एपीके (APK) फाईलपासून सावध राहा; मोबाईल हॅक होऊन फसवणुकीचा मोठा धोका

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

बनावट आरटीओ ई-चलनाच्या नावाने व्हॉट्सॲपवर पाठविल्या जाणाऱ्या एपीके (APK) फाईलमुळे मोबाईल हॅक होण्याचा आणि सायबर फसवणुकीचा धोका वाढला आहे. त्यामुळे स्मार्टफोन वापरणाऱ्यांनी अशा कोणत्याही एपीके फाईलवर क्लिक किंवा ती डाउनलोड करू नये, असे आवाहन सायबर गुन्हे शाखेने केले आहे.

राज्य सरकारने १६ जुलैपासून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना एआय (AI) कॅमेरा नेटवर्कद्वारे ऑनलाइन पोर्टल आणि एसएमएसच्या माध्यमातून ई-चलन पाठविण्याची व्यवस्था सुरू केली आहे. या अधिकृत प्रक्रियेचा गैरफायदा घेत सायबर भामट्यांनी सरकारी ॲपप्रमाणे दिसणारे बनावट ॲप तयार केल्याचे समोर आले आहे.

सायबर तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ही एपीके फाईल डाउनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर मालवेअर फोनमधील संपर्क, संदेश आणि अन्य माहितीवर ताबा मिळवते. तसेच संबंधित व्यक्तीच्या व्हॉट्सॲपवरील सर्व संपर्कांना हीच संसर्गजन्य फाईल आपोआप पाठविली जाते. त्यामुळे हा व्हायरस वेगाने पसरत आहे.

सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, अद्याप अशा प्रकारची अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नसली तरी नागरिकांनी संशयास्पद फाईल मिळाल्यास तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधावा. मोबाईलमध्ये संशयास्पद हालचाल दिसल्यास किंवा आपल्या क्रमांकावरून व्हायरस पाठविला जात असल्याची माहिती मिळाल्यास विलंब न करता तक्रार नोंदवावी. सरकारी कामाच्या नावाखाली व्हॉट्सॲपवर येणारी कोणतीही एपीके फाईल डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नये, असा इशाराही सायबर विभागाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT