दोडामार्ग : पुढारी वृत्तसेवा
घोटगेवाडी येथे पाच हत्तींच्या कळपाने अक्षरशः धुडगूस घालून येथील बागायती उद्ध्वस्त केली आहे. यात शेतकरी विठ्ठल शंभू गोवेकर व नारायण महाबळेश्वर भणगे यांच्या नारळ, सुपारी व केळींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घोटगेवाडी परिसरात मागील काही दिवसांपासून गणेश टस्करासह पाच हत्तींचा कळप वावरत आहे. मंगळवारी रात्री ८ वा. च्या सुमारास हा कळप शेतकरी गोवेकर यांच्या बागेत शिरला. त्यानंतर रात्री १ वा. पर्यंत सलग पाच तास या कळपाने बागायतीत धुडगूस घालत नुकसान केले. डोळ्यादेखत उभ्या बागायती नष्ट झाल्याचे पाहून गोवेकर यांना अश्रू अनावर झाले. शेतकरी भणगे यांच्याही बागायतीत घुसून अतोनात नुकसान केले. यात नारळ, सुपारी व केळीची झाडे उद्ध्वस्त केली.