पणजी : पुढारी वृत्तसेवा
हत्तीग्राम (एलिफंट कॅम्प) होईपर्यंत हत्ती नैसर्गिक अधिवासातच राहणार, हे आता निश्चित झाले आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने हत्ती पकड मोहीम राबवता येणार नाही, शिवाय न्यायालयाने ओंकारसह अन्य हत्तींना हत्तीग्राममध्ये ठेवण्याचे आदेश दिल्याने हत्ती पकड मोहीम राबवता येणार नाही, त्यासाठी आजरा येथे हत्तीग्राम उभारणार आहे,
असे कोल्हापूर येथील मुख्य वनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी सांगितले. दोडामार्ग तालुक्यातील शिष्टमंडळाने हत्ती पकड मोहीम राबवण्याच्या मागणीसाठी आज, मंगळवार दि, १३ जानेवारी २०२६ रोजी कोल्हापूर येथे जी. गुरुप्रसाद यांची भेट घेतली.
यावेळी सावंतवाडीचे उपवनसंरक्षक मिखिलेश शर्मा, स्वराज्य सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, दोडामार्ग तालुका फळ बागायतदार संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय देसाई, माजी वित्त व बांधकाम सभापती तुकाराम बर्डे, समीर देसाई, राजाराम देसाई आदी उपस्थित होते. बैठकीनंतर जी. गुरुप्रसाद म्हणाले, सीमेवर कर्मचारी नियुक्त करणे, हत्तींच्या येण्याच्या जागा बंद करणे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
आचारसंहितेनंतर अन्य वन्य प्राण्यांना रोखण्यासाठी सौर ऊर्जा कुंपणाची कार्यवाही करण्यात येणार आहे. मात्र, हत्ती पकडबाबत निर्णय घेणे अशक्य आहे. प्रवीण गवस म्हणाले की, बैठकीत नुकसान भरपाईत वाढ आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर चर्चा झाली. याचिका दाखल असल्याने हत्ती पकड मोहीम होणार नाही. त्यामुळे आता आम्हीही याचिका दाखल करणार आहोत.
या महिन्याच्या अखेरीस उपवनसंरक्षक शर्मा आणि शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा विचार आहे. त्यासाठी मी दोडामार्गमध्ये येणार आहे.- जी गुरुप्रसाद, मुख्य वनसंरक्षक.