मोर्लेत हत्तीच्या हल्ल्यात वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू Pudhari photo
गोवा

गोवा : मोर्लेत हत्तीच्या हल्ल्यात वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू

गावकऱ्यांचा वनविभागावर संताप

करण शिंदे

मोर्ले, पुढारी वृत्तसेवा : मागील काही दिवसांपासून मोर्ले व केर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या टस्कर हत्तीच्या हल्ल्यात आज मंगळवार (दि.०८) सकाळी शेतकरी लक्ष्मण यशवंत गवस (वय.७०) यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना ते त्यांच्या काजू बागायतीत जात असताना घडली.

या परिसरात या टस्करचा वावर काही दिवसांपासून सुरू असून, याआधी देखील याच हत्तीने मोर्ले येथील एका महिलेवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. मात्र, गावकऱ्यांच्या वेळेवरच्या हस्तक्षेपामुळे तेव्हा मोठा अनर्थ टळला होता. मात्र आज लक्ष्मण गवस यांच्यावर अचानक हल्ला होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. गवस कुटुंबीयांच्या पार्श्वभूमीकडे पाहता ही घटना आणखीनच वेदनादायक आहे. लक्ष्मण गवस यांची पत्नी व एक मुलगा यांचे याआधी निधन झाले आहे, तर दुसरा मुलगा आणि सून अपंग असून ते दोघे सावंतवाडीत वडापावच्या स्टॉलवर काम करतात. त्यांना एक लहान मुलगा देखील आहे. संसाराचा गाडा चालवण्यासाठी लक्ष्मण गवस रोज बागायतीत राबत होते, मात्र टस्करच्या हल्ल्याने त्यांचे आयुष्य संपवले.

हत्तीच्या दहशतीमुळे स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे. हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाने तत्काळ मोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत वनमंत्री गणेश नाईक आणि आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत वनाधिकाऱ्यांची बैठक देखील झाली होती. दरम्यान, या घटनेबाबत पत्रकार प्रथमेश गवस यांनी आमदार दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी लवकरच चर्चा करून हत्ती पकड मोहिमेबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता ही मोहीम तातडीने राबवण्यात यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT