Mapusa ED raids | कॅसिनोसह म्हापशात ईडीचे छापे Pudhari
गोवा

Mapusa ED raids | कॅसिनोसह म्हापशात ईडीचे छापे

रोख रकमेसह कोट्यवधींच्या मुद्देमालासह डिजिटल पुरावे जप्त

पुढारी वृत्तसेवा

पणजी : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) म्हापसा मार्केटमधील लोजा शामू या आस्थापनावर छापा टाकून परकीय चलनाच्या अवैध व्यवहाराचा पर्दाफाश केला. या व्यवहाराची किंमत सुमारे 2 ते 3 कोटींच्या आसपास आहे. या कारवाईवेळी परकीय चलनासह रोख रक्कम तसेच काही डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात आणखी काहींच्या सहभागाची शक्यता आहे, अशी माहिती ईडीच्या सूत्राने दिली.

काही दिवसांपूर्वी कस्टम्सच्या अधिकार्‍यांनी गोवा विमानतळावर कारवाई करून एका व्यक्तीकडून सुमारे 35 हजार अमेरिकी डॉलर्स जप्त केले होते. या जप्त केलेल्या रकमेची अधिकार्‍यांनी चौकशी केली असता म्हापशातील एका आस्थापनाच्या व्यक्तीचे नाव समोर आले होते. या डॉलर्सच्या व्यवहाराशी त्याचा संबंध असल्याचे उघड झाले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सुरू करून यामध्ये आणखी कोणी व्यक्ती गुंतल्या आहेत का, याचा शोध घेतला जात आहे. या आस्थापनाच्या कारवाईवेळी अधिकार्‍यांनी सुमारे 3 लाख रुपयांचे परकीय चलन, 13 लाखांचे भारतीय चलन तसेच या चलनाच्या संबंधित संशयास्पद कागदपत्रे तसेच मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. या मोबाईलमधील

काही चॅट्स व फोन क्रमांक मिळवून या आस्थापनाच्या मालकाचा कोणाशी संबंध आहेत, याची माहिती मिळवण्यात येत आहे. आतापर्यंत केलेल्या चौकशीत सापडलेली माहिती ही फेमा कायद्याचे उल्लंघन करणार आहे. म्हापसा आस्थापनामधून जप्त करण्यात आलेल्या परकीय चलनसंदर्भात सखोल चौकशी करून या रॅकेटमध्ये आणखी काहीजण असण्याची शक्यता आहे. अवैध परकीय चलन त्याने कोणाकडून घेतले याचा शोध घेण्यात येत आहे. या रॅकेटचे लागेबांधे गोव्याबाहेरही असण्याची शक्यता असल्याचा ईडीचा संशय आहे.

विदेशी चलन घेतले ताब्यात

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गेल्या दोन दिवसांपासून कांपाल-पणजी येथील मांडवीतील एका तरंगत्या कॅसिनो कार्यालयावर छापा टाकून चौकशी सुरू केली आहे. या चौकशीदरम्यान अधिकार्‍यांनी जुगार गैरव्यवहारप्रकरणीचे दस्तावेज व कोट्यवधींची रक्कम जप्त केली आहे. या कारवाईवेळी भारतीय चलनातील 2.5 कोटी, 14 हजार अमेरिकन ॉलर्स, विविध विदेशी चलनातील सुमारे 8.50 लाख रुपये तसेच क्रिप्टोकरन्सीच्या स्वरुपात सुमारे 90 लाखांचे अमेरिकन डॉलर्स जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या या चलनाची चौकशी करण्यात येऊन पुढील कारवाई केली जाईल.

मिळालेल्या माहितीनुसार या कसिनोमध्ये जुगारचा व्यवहार पारदर्शक नसल्याची माहिती ईडीला मिळाली होती. त्यानुसार ईडीने एकाचवेळी कसिनोच्या कार्यालयावर तसेच कसिनो जहाजावर छापे टाकले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT