पणजी : पणजीसह राज्यात अन्य ठिकाणच्या सात कॅसिनोंच्या कार्यालयांवर शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे टाकले. यावेळी अनेक महत्त्वाची कागदपत्रे ईडीच्या अधिकार्यांनी जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बंगळुरू येथील ईडीच्या प्रादेशिक कार्यालयाने ही कारवाई केली आहे. या कारवाईसाठी एकूण सात पथके स्थापन करण्यात आली आहेत.
चित्रदुर्ग-कर्नाटक येथील काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र यांच्याशी संबंधित मनी लाँडरिंग, बेकायदा बेटिंग व ऑनलाईन जुगार प्रकरणाच्या तपासांतर्गत ही छापेमारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पणजीतील पाटो परिसर, कांदोळी व कळंगुट येथील कॅसिनोंच्या कार्यालयावर ही छापेमारी करण्यात आली. आमदार के. सी. वीरेंद्र यांच्याशी संबंधित मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडीने देशभरात 30 कॅसिनोंच्या कार्यालयांवर छापे टाकले.