पणजी : राज्यातील बांधकाम क्षेत्रातील कामगारांना ई-कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. बांधकाम कल्याण मंडळांतर्गत कामगारांसाठी गृहनिर्माण योजना तयार केली जात आहे, तर डिचोली आणि सांगेत ईएसआय इस्पितळ उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. कामगार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, कामगारांनी निषेधाच्या मार्गाऐवजी रचनात्मक संवादाचा मार्ग स्वीकारावा. सरकारही कामगारांच्या कल्याणासाठी पूर्णतः वचनबद्ध असून त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहे. गोव्यातील कामगार हे राज्याच्या प्रगतीचे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि हक्काचे जीवनमान देण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील आहे. मात्र, आंदोलन व निषेधाच्या मार्गाने न जाता, सरकारशी चर्चा करून समस्या सोडवणे हेच हिताचे ठरेल. कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत यांनी राज्य सरकारच्या विविध श्रमिक कल्याण योजनांचा आढावा घेतला. त्यांनी नमूद केले की, असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी विमा योजना, आरोग्य सेवा, अपघात विमा तसेच निवृत्तीनंतरच्या सुरक्षिततेसाठी विविध योजना सुरू आहेत. त्याचबरोबर कामगारांसाठी घरे, सामाजिक सुरक्षा, मुलांसाठी शैक्षणिक सुविधा अशा योजनाही राबविल्या जात आहेत.
कामगार दिनाचे औचित्य साधून त्यांनी कामगार वर्गाच्या योगदानाचे कौतुक केले. मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, राज्यातील विकासात कामगारांचे योगदान अमूल्य आहे. त्यांचे हित साधणे हे आमचे प्राधान्य आहे. या आवाहनानंतर काही प्रमुख कामगार संघटनांनी सरकारच्या संवादाच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. काही संघटनांनी मात्र आपल्या मागण्यांवर त्वरित कृती व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. लवकरच सरकार आणि संघटनांमधील बैठक आयोजित केली जाण्याची शक्यता आहे.
कोणत्याही कामगार संघटनेने जर आपल्या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली, तर सरकार चर्चेसाठी नेहमीच खुले आहे. आम्ही कोणत्याही मागणीस नकार देत नाही; पण ती न्याय्य आणि योग्य पद्धतीने मांडली गेली पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.