Water Supply Pudhari
गोवा

Goa Durgabhat water crisis protest| येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास घागर मोर्चा, दुर्गाभाटमध्ये पाणीटंचाई

दोन दिवसांत पुरवठा सुरळीत न झाल्यास घागर मोर्चाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

फोंडा : दुर्गाभाट-तळे फोंडा परिसरात ऐन दिवाळीत गेल्या तीन दिवसांपासून नळाला पाणी नसल्याने रहिवाशांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास दाग फोंडा येथील पाणीपुरवठा कार्यालयावर घागर मोर्चा नेण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

दुर्गाभाट तसेच आसपासच्या भागात गेल्या बऱ्याच काळापासून पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. दिवाळीच्या सणातही पाणी उपलब्ध न झाल्याने टँकरचे पाणी येईपर्यंत नागरिकांना प्रतीक्षा करावी लागली. नळाला पाणी नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच पाणी खात्याच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने विचारणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या फोंड्यातील जनता दरबारातही हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मात्र, अद्याप त्यावर ठोस तोडगा निघालेला नाही.

फोंडा पालिकेचे नगरसेवक विश्वनाथ दळवी यांनीही हा प्रश्न लावून धरला आहे. मात्र, समस्या कायम असल्याने नागरिकांना पाण्यासाठी धडपड करावी लागत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पाणी खात्याच्या कार्यालयावर घागर मोर्चा नेण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

मुख्यमंत्री आल्यानंतरच मिळते पाणी!

या भागात गेल्या सहा महिन्यांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. मुख्यमंत्र्यांच्या फोंड्यातील जनता दरबारात हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्यांनी पाणी खात्याच्या अधिकाऱ्यांना खडसावले होते. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला. मात्र, मुख्यमंत्री गेल्यानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या, अशी स्थिती झाली आहे. निदान आता तरी पाणीपुरवठा नियमित करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT