सावईवेरे : वेलकास-सावईवेरे येथे रविवारी सकाळी 9 च्या सुमारास कदंब बसने कारला (जीए 01 ई 3399) जबरदस्त धडक दिल्याने कणकवाडा-सावईवेरे येथील वीज खात्याचे कर्मचारी गुरुदास दत्ता नाईक हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी प्रथम फोंड्याच्या उपजिल्हा रुग्णालयात व नंतर गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही वाहने समोरासमोरून येताना हा अपघात झाला. ही धडक एवढी जबरदस्त होती की या अपघातात कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदंब बस सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास सावईवेरेहून वेलकासमार्गे फोंड्याच्या दिशेने जात होती, तर कारचालक केरीहून सावईवेरेला येत असताना वेलकास येथे हा अपघात घडला. वेलकास हा अतिशय वळणांचा रस्ता असल्याने समोरासमोरून येणारी वाहने दृष्टीस पडत नसल्याने याठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते. वेलकास येथील एका वळणाच्या जरा पुढे कदंब बसची कारला जोरदार धडक बसली. या अपघातात कारचालक गुरुदास नाईक हे गंभीर जखमी झाले आहेत. पंचायत सदस्य नवनाथ वेलकासकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, हा रस्ता अरुंद वळणांचा असूनदेखील बसचालक जास्त वेगाने बस चालवतात. अरुंद रस्ता असल्याचे भानही चालकांना नसते. त्यामुळे चालकांनी या रस्त्यावर सावधानीपूर्वक बसेस चालवाव्यात, असे आवाहन केले.