मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत   Pudhari Photo
गोवा

Goa | मुख्यमंत्र्यांकडून ‘त्या’ डॉक्टरला अभय

निलंबन टळले : याप्रकरणी चौकशी नियमांनुसारच

पुढारी वृत्तसेवा

पणजी : रुग्णांशी असभ्यपणे वागल्याबद्दल गोमेकॉ इस्पितळातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना निलंबित करण्याचा आदेश आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी शनिवारी दिला होता. रविवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या संदर्भात, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याशी चर्चा केल्यानंतर डॉ. कुट्टीकर यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे. निलंबन जरी टळले असले, तरी या प्रकरणाची चौकशी नियमांनुसार होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, ‘या प्रकरणाचा आढावा मी घेतला असून, आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. मी गोमंतकीय जनतेला खात्री देऊ इच्छितो की, डॉ. कुट्टीकर यांना निलंबित केले जाणार नाही. राज्य सरकार आणि आमचे समर्पित वैद्यकीय पथक प्रत्येक नागरिकाला सर्वोच्च सेवा देण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. जीव वाचविणार्‍या आमच्या डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांचे आणि अमूल्य सेवेचे आम्ही कौतुक करतो.’

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी शनिवारी गोमेकॉत आकस्मिक भेट देऊन, ज्या पद्धतीने डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना फैलावर घेतले होते आणि त्यांच्या निलंबनाचा आदेश काढण्याचे निर्देश दिले होते, यावरून नेटिझन्सनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संस्था व सामाजिक कार्यकर्तेही याबाबत सोशल मीडियावर व्यक्त झाले होेते. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने या प्रकरणी निषेध केला होता. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने मुख्यमंत्री, तसेच पंतप्रधान कार्यालयातही लेखी तक्रार करून 72 तासांच्या आत या प्रकरणी मंत्री राणे यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती.गोमेकॉतील निवासी डॉक्टरांच्या ’गार्ड’ या संघटनेने म्हटले आहे की, ’मंत्री विश्वजीत राणे यांच्या वर्तनामुळे आरोग्यसेवा कर्मचार्‍यांचे मनोबल खचले आहे. रुग्णांप्रति आमची वचनबद्धता आहे, परंतु आमच्या सदस्यांचे संरक्षण करण्याचा आमचा निर्धार आहे.’ या प्रकरणी 48 तासांच्या आत कोणतीही कारवाई केली नाही, तर मूक ब्लॅकआउट निषेध सुरू करू आणि त्यानंतर सामूहिक संपावर जाऊ, असा इशारा संघटनेने दिला आहे.

48 तासांत माफी मागा, अन्यथा संप : ’गार्ड’

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी डॉक्टरांशी केलेल्या गैरवर्तनाबद्दल 48 तासांत जाहीर माफी मागावी, अन्यथा आम्ही संप करू, असा इशारा ’गार्ड’ या संघटनेने दिला आहे. मंत्र्यांचे वर्तन आक्षेपार्ह आणि संतापजनक होते, असे संघटनेने म्हटले आहे. आरोग्यसेवा देणार्‍या कोणत्याही कर्मचार्‍याला पुन्हा अशा अपमानाचा सामना करावा लागू नये, असे संघटनेने म्हटले आहे. संघटनेने पाच कलमी केलेल्या मागण्यांमध्ये आपत्कालीन आणि अपघात विभागांमध्ये प्रसार माध्यमांद्वारे व्हिडीओग्राफीवर पूर्ण बंदी आणली जावी, क्लिनिकल सेटिंग्जमध्ये व्हीआयपी संस्कृती असू नये, वैद्यकीय निकडीच्या आधारावर रुग्णसेवेला प्राधान्य असावे, अशा मागण्या केल्या आहेत.

...तर रस्त्यावर उतरू

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी या संदर्भात, पत्रकार परिषद घेऊन आरोग्यमंत्र्यांच्या वर्तनावर मत व्यक्त केले आहे. पाटकर म्हणाले, या गैरवर्तनाबद्दल विश्वजित राणे हे भारतीय न्याय संहितेच्या कलमांन्वये गुन्ह्यास पात्र ठरतात. त्यांना दोन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे स्वतः डॉक्टर आहेत. त्यांनी या प्रकरणी गंभीर लक्ष देणे आवश्यक आहे. आरोग्यमंत्र्यांनी या वर्तनाबद्दल जाहीर माफी मागावी, अन्यथा आंदोलक डॉक्टरांसोबत काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा अमित पाटकर यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT