Goa Dr. Ketan Bhatkar political dream unfulfilled Pudhari photo
गोवा

Goa Dr. Ketan Bhatkar |फोंड्यातील डॉ. केतन भाटकर यांचे आमदारकीचे स्वप्न राहिले अपुरे

Goa Dr. Ketan Bhatkar |फोंड्यातील डॉ. केतन भाटकर यांचे आमदारकीचे स्वप्न राहिले अपुरे

पुढारी वृत्तसेवा

Goa Dr. Ketan Bhatkar political dream unfulfilled

फोंडा येथील डॉ. केतन भाटकर यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांचे आमदारकीचे स्वप्न अपुरेच राहिले. ते हिंदुत्ववादी विचाराचे, पण आमदार होण्यासाठी ते नाईलाजे काँग्रेसमध्ये दाखल झाले होते, तरी त्यांचे स्वप्न अपुरेच राहिले. भाजपची उमेदवारी मिळावी, यासाठी २०२२ मध्ये त्यांनी प्रयत्न केले. मात्र, विद्यमान आमदार म्हणून आणि माजी मुख्यमंत्री म्हणून रवी नाईक यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यामुळे भाटीकर मगो पक्षात गेले आणि रवी नाईक यांना जोरदार टक्कर दिली. अवघ्या ७० मतांच्या फरकाने ते पराभूत झाले. नाईक यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत भाजपची किंवा मगोची उमेदवारी मिळत नसल्याने नाईलाजाने ते काँग्रेसमध्ये गेले. पण, पोटनिवडणूक झाली नाही आणि त्यांचे आमदारकीचे स्वप्न अपुरेच राहिले.

विजयची तयारी

गोवा फॉरवर्ड येत्या निवडणुकीत किमान दहा जागा लढवणार आहे, असे पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे. गुढी पाडव्यापासूनच त्यांनी एकला चलो रे ची तयारी केली होती. तेव्हाच त्यांनी ही घोषणा केली होती. मात्र आता नवीन बातमी ही की त्यांनी एका एजन्सीला सव्र्व्हे करायला सांगितले आहे. त्या आधारावर ते १० जागा लढवणार आहेत. आपल्याबरोबर कुणाला यायचे तर येऊ शकतात असे त्यांनी म्हटले आहे. बरोबर येणारे १० जागांत वाटेकरी असणार की उर्वरीत ३० जागांसाठी ते स्पष्ट झालेले नाही

काब्रालांची अळंबी

नीलेश काब्राल हे रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. विधानसभेतही ते आपल्या खणखणीत आवाजात प्रश्न उपस्थित करत असतात. अनेकदा आपल्याच पक्षाच्या कंयाला अडचणीचे प्रश्न विचारतात. मंत्रिपद गेल्यापासून कुडचड्यात आपल्याला डावलले जात असल्याची त्यांची भावना आहे. अलीकडेच त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना निवडणुकीच्या तोंडावर अनेक अळंबी उगवत असतात, असे भाष्य केले आहे. नवनव्या राजकीय नेत्यांच्या उदयावर ते बोलत होते. येत्या विधानसभा निवडणुकीत कोण कुठल्या पक्षात असेल, कोणाला तिकीट नाकारले जाईल याची काही शाश्वती राहिलेली नाही. अनेकांना पक्षांतर्गतच प्रतिस्पर्धी निर्माण झाले आहेत आणि त्यांना वरिष्ठ नेतृत्व फूस देत असल्याचीही अनेकांची भावना आहे. काब्राल यांचे वक्तव्य त्याच भावनेतून होते.

क्रिकेट मैदान लवकर बांधा हो...

गोव्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान नाही, पूर्वी फातोर्डा येथील मैदानावर भारत - ऑस्ट्रेलिया सामने झाले होते. आता तेथे फक्त फुटबॉल सामने होतात. क्रिकेट मैदानाअभावी अनेक वर्षे गोव्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने झालेले नाहीत. गोवा सरकारने गोवा क्रिकेट संघटनेला (जीसीए) धारगळ येथे मैदान बांधण्यासाठी जागा दिलेली आहे. दुसरीकडे जीसीएने वन मावळिंगे येथे स्वतः जागा घेतलेली आहे. बीसीसीआयकडून मैदानासाठी भरीव मदत मिळू शकते. मात्र, जीसीए काही हालचाल करताना दिसत नाही. त्यामुळे क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी मैदान बांधा न पेक्षा धारगळची जागा परत घेऊ, असा इशारा दिला आहे. आतातरी जीसीए जागी होते का पाहावे लागेल.

सरकारी नोकरीचे गारूड

सरकारी नोकरी म्हणजे आरामदायी सुरक्षित नोकरी, कमी काम वेतन भरपूर, अनेक सुट्ट्या, अनेक सवलती आणि त्यामुळेच जो तो सरकारी नोकरीच्या मागे धावताना दिसतो. गोवा सरकारने गोवा कर्मचारी आयोगातर्फे विविध पदे भरण्यासाठी जाहिराती दिलेल्या आहेत. त्यात पोलिस कॉन्स्टेबलची मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. २५ हजार अर्ज आलेत. त्यात अभियंते व वकीलही आहेत, यावरून सरकारी नोकरीचे गारुड किती आहे, ते स्पष्ट होते. यापूर्वीसुद्धा खाजगी बँकेमध्ये मॅनेजर म्हणून काम करणाऱ्यांनी सरकारचे एलडीसी होणे पसंत केले होते. सरकारी नोकरी सहजपणे मिळत असेल तर ती का नको? अशीच युवांची मानसिकता बनली आहे.

कदंब स्थानके स्वच्छ ठेवा

आरोग्य सेवा संचालनालयाने कदंब स्थानके स्वच्छ ठेवा हे आवाहन केले आहे ते आरोग्याच्या दृष्टिकोनातून. डेंग्यू, मलेरियाचा धोका लक्षात घेऊन गर्दीची ही ठिकाणे असल्याने तशी सूचना केली आहे. पण एरवीही कदंब स्थानकांवर स्वच्छता आवश्यक आहे. पणजी बसस्थानक तर राज्याचा चेहरा आहे. बाहेरच्या राज्यांतून बसने येणारे लोक प्रथम पणजी बसस्थानकावरच उतरतात. बसस्थानकावर ओंगळवाणे दृश्य दिसल्यास ते गोव्याबद्दल चांगल्या स्मृती घेऊन जाणार नाहीत. पर्यटनाच्या दृष्टीने अशा प्रत्येक गोष्टीचा विचार सरकारने करायला हवा.

पश्चिम बंगाल विजयाचा जल्लोष

जेव्हा पश्चिम बंगालमध्ये 'कमळ' फुलले, तेव्हा भाजपने आपला अभूतपूर्व विजय केवळ राज्याच्या राजधानीतच नव्हे, तर संपूर्ण राज्यात साजरा केला. सत्ताधारी पक्षाच्या सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, पक्षाच्या नेतृत्वाने आपल्या कार्यकर्त्यांना प्रत्येक मतदारसंघात विजय मिरवणुका काढण्याचे निर्देश दिले होते. पश्चिम बंगालमधील भाजपचा हा पहिलाच मोठा विजय असल्याने हा जल्लोष समजण्यासारखा असला, तरी राजकीय निरीक्षक यामागे काही दडलेले आहे का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत; विशेषतः गोव्यामध्ये होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात. कारण, जेव्हा २०२२ मध्ये तृणमूल काँग्रेसने गोव्यात जोरदार प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा त्यांना भाजपच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला होता; भाजपने त्यावेळी ममता बॅनर्जी यांना 'हिंदूविरोधी' म्हणून चित्रित केले होते.

सावर्डेत उमेदवार वाढले

सावर्डे विधानसभा मतदारसंघांमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विद्यमान आमदार तथा सभापती डॉ. गणेश गावकर हे इचछुक आहेतच. माजी मंत्री व या मतदारसंघाचे माजी आमदार विनय तेंडुलकर यांनीही भाजपने उमेदवारी दिली तर लढण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा व माजी जिल्हा पंचायत सदस्या सुवर्णा तेंडुलकर यांनाही निवडणूक लढण्याची इच्छा आहे, युवा कार्यकर्ते संकेत आर्सेकर हेही भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. दुसरीकडे माजी मंत्री दीपक पाऊसकर यांनीही या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सावर्डे मतदारसंघात इच्छुक वाढत आहेत.

तंबू उलथवायची वाट पाहू नका

राज्यात मोकळ्या जागा हेरून अनेक कुटुंबे वस्ती करीत आहेत. काही कुटुंबे मोलमजुरी, तर काही कुटुंबे भीक मागून गुजराण करीत आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतेक परराज्यातील आहेत. सध्या बांगलादेशी, रोहिंग्या संपूर्ण भारतभर आपले हातपाय पसरत आहेत. गोवा पोलिस अशा कुटुंबांची आस्थेने चौकशी करून त्यांना संरक्षण देऊन पुनर्वसन करण्याचे प्रयत्न करीत आहेत. मात्र, यातील काहीजण उंटाच्या पिल्लांसारखी आहेत. लहान आहेत म्हणून तुम्ही तुमच्या तंबूत ठेवाल, तर मोठी झाल्यावर तुमच्या तंबू उलथवून आपली ताकद दाखवायला मागेपुढे पाहणार नाहीत. त्यामुळे सखोल चौकशी करून त्यांच्याबाबत योग्य निर्णय घेण्याची गरज अनेकजण व्यक्त करीत आहेत.

किरण अपक्ष लढणार की...

थिवीचे माजी आमदार किरण कांदोळकर यांनी थिवी मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या जिल्हा पंचायत सदस्य असलेल्या पत्नी किरण कांदोळकर यांना थिवीत उभे केले आणि स्वतः हळदोण्यात उभे राहिले. मात्र, तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार उभे राहिल्यामुळे त्यांना पराभूत व्हावे लागले, अशी चर्चा होती. तसेच ते स्वतः थिवीत उभे राहिले असते तर निवडून आले असते असे लोक म्हणत होते. आता पुन्हा एकदा 2027 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी त्यांनी सुरू केली असून विद्यमान आमदार म्हणून मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना भाजप उमेदवारी देणार आहे. मात्र, त्यांच्याऐवजी आपल्याला उमेदवारी मिळावी अशी सुप्त इच्छा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांना आहे. त्यांनी ती जाहीररीत्या व्यक्त केलेली नाही. पक्षाने उमेदवारी दिली तर लढणार, असे ते म्हणत आहेत. त्यामुळे किरण कांदोळकर यांना भाजपची उमेदवारी मिळणे कठीण दिसत असल्याने त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.

काँग्रेसचे लक्ष 'बाळ्ळी' पंचायतीवर

मागच्या आठवड्यात विशेषतः सासष्टी तालुक्यात काही वेगळ्याच प्रकारच्या घडामोडी घडल्या. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता या काँग्रेसच्या जोडीने, बाळ्ळीच्या उपसरपंचांना पदावरून हटवण्याचा प्रयत्न हाणून पाडल्याचे दिसून आले. बाळ्ळी पंचायतीचे नेतृत्व भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर गावकर यांच्याकडे असले, तरी उपसरपंचपद काँग्रेसकडे आहे. उपसरपंचांना पदावरून दूर करण्याचा डाव उधळून लावल्यानंतर, आता युरी-एल्टन या जोडीने बाळ्ळी पंचायतीवर पुन्हा ताबा मिळवण्याच्या उद्देशाने एक 'प्रति-रणनीती' आखण्यास सुरुवात केल्याचे समजते. हे स्पष्ट आहे की, बाळ्ळी येथील राजकीय लढाई अजून संपलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT