पणजी : पुढारी वृत्तसेवा
आसाममधील डीबी स्टॉक या ऑनलाईन ट्रेडिंग घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी दीपंकर बर्मन याला गुवाहाटी पोलिसांनी गोवा पोलिसांच्या मदतीने (रविवार) गोव्यातून अटक केली. या प्रकरणात यापूर्वीच अनेक जणांना अटक केली असून दीपंकर अनेक दिवसांपासून फरार होता.
त्याला आज (सोमवार) गोवा न्यायालयात हजर केले जाईल आणि त्यानंतर त्याला ट्रान्झिट रिमांडवर गुवाहाटीला नेण्यात येईल. हा घोटाळा तब्बल सात हजार कोटींचा आहे. आसाम पोलीस महासंचालक जे. पी. सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कोट्यवधींचा ऑनलाईन ट्रेडिंग घोटाळा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात उघड झाला होता. (२९ वर्षीय) बर्मनच्या कंपनीत शेकडो गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. परंतु त्यांना परतावा मिळाला नाही आणि कंपनीचे कार्यालय बंद करण्यात आल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.
गुवाहाटीचे पोलीस आयुक्त दिगंत बारा यांनी सांगितले की, सहाय्यक पोलीस आयुक्त अमित महतो यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोवा पोलिसांच्या मदतीने ही अटक केली. या घोटाळ्यात सहभागी असलेल्या ६५ हून अधिक लोकांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी बर्मनच्या पालकांनाही अटक करण्यात आली होती. या घोटाळ्यात आसामी अभिनेत्री सुमी बोराह आणि तिचा फोटोग्राफर पती तारिक बोराह यांचाही सहभाग असून त्यांनाही अटक करण्यात आली आहे.
आसाम राज्य सरकारने या घोटाळ्यासंदर्भात दाखल झालेल्या ४१ गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कंपन्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस परतावा मिळेल, असे सांगून राज्यभरातील लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले होते.