विलास महाडिक
पणजी : सायबर क्राईम गुन्ह्यांमध्ये आता नव्याने ट्रेंड आला आहे, तो म्हणजे डिजिटल अरेस्ट. या नव्या प्रकारच्या गुन्हेगारीमुळे अनेकजण घाबरून गुन्हेगार जे काही सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवून ऑनलाईन रक्कम ट्रान्स्फर करतात. जेव्हा ही सर्व काही फसवणूक आहे; हे कळेपर्यंत लाखो रुपये सायबर क्राईम गुन्हेगाराने हडप केलेले असतात. डिजिटल अरेस्टसंदर्भात गोव्यात सुमारे 10 तक्रारी दाखल झाल्या आहेत व लाखो रुपयांना गुन्हेगारांनी फसवणूक केली आहे.
आयकर खात्याच्या नावाने काही गुन्हेगार ते आयकर अधिकारी असल्याचे सांगून लोकांना आयकर चुकवेगिरी केल्याचे सांगून घाबरवतात. त्यांनी ही रक्कम त्वरित जमा न केल्यास त्यांना अटक होईल, अशी भीती घालतात. त्यामुळे आयकर न भरलेल्या व्यक्ती गुन्हेगारांच्या जाळ्यात सापडल्यावर त्याना अटकेची भीती दाखवतात. जर त्यांनी सांगितलेली रक्कम दिलेल्या खाते क्रमांकावर पाठवल्यास त्यांची यातून सुटका होऊ शकते, असा पर्यायही देतात. त्यामुळे मागचा पुढचा विचार न करता ते रक्कम ऑनलाईन ट्रान्झेक्शन करून मोकळे होतात. अशी गोव्यात सुमारे 7 ते 8 प्रकरणे नोंद झाली आहेत. त्यातील दोन प्रकरणांत सायबर क्राईम पोलिसांनी अत्याधुनिक पद्धतीने त्यांना गजाआड करण्यात यश मिळवले आहे.
सायबर गुन्हेगार अनेक युक्त्यांद्वारे ज्येष्ठ नागरिक, तसेच रक्कम गुंतवणूक करणार्या लोकांचा शोध घेऊन ते आपले सावज बनवत आहेत. गोवा पोलिसांनी 1930 हा टोल फ्री क्रमांक तक्रारीसाठी लोकांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. सायबर सुरक्षेसाठी स्पॉट द स्कॅम हे साधन विकसित केले आहे. या साधनाची लिंक गोवा पोलिसांच्या वेबसाईटवर तसेच पर्यटन विभागाच्या वेबसाईटवर पोस्ट केली गेली आहे. जिथे लोक वेबसाइटची सत्यता तपासू शकतात. या वेबसाईटवर गुन्हेगाराने पाठविलेल्या लिंकची सत्यता पडताळून पाहता येणार आहे. लोकांना या लिंक उपलब्ध करून देण्यात आल्या असल्या तरी घाबरून गुन्हेगारांच्या आमिषाला किंवा त्यांनी दाखवलेल्या भीतीला बळी पडत आहेत.
आयआरबी पोलिस टोल फ्री क्रमांक 1930 यावर येणार्या तक्रारी तसेच लोकांना सायबर क्राईम संदर्भात हवी असलेली माहितीचे काम करत आहेत. या स्थानकाकडे अत्याधुनिक संगणक सॉफ्टवेअर असल्याने सायबर गुन्हेगाराने कोणत्या भागातून आर्थिक व्यवहार केले त्याचा शोध घेण्याची यंत्रणा आहे. सायबर क्राईमच्या पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 288 सत्रे घेऊन या गुन्ह्यासंदर्भातची जनजागृती केली आहे. त्यात शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, पालिका व पंचायती तसेच प्रसार माध्यमे, रेल्वे स्थानके, टॅक्सी स्टँड, बसस्थानके, विविध मार्केट परिसर तसेच हॉटेल संघटना यांना त्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
गोव्यात सायबर क्राईम पोलिस स्थानक 2014 साली क्राईम ब्रँचच्या विभागाखाली स्थापन झाले होते. सुरुवातीस सायबर क्राईम गुन्ह्यांची संख्या क्वचितच एखाद दुसरा असायची; मात्र 2020 पासून हे प्रमाण वाढत गेल्याने हे स्थानक पूर्णपणे अत्याधुनिक करण्यात आले. त्यासाठी 56 पोलिसांची नियुक्ती केली. त्यात 2 पोलिस निरीक्षक, 8 उपनिरीक्षक, 2 सहायक उपनिरीक्षक, 6 पोलिस हवालदार, 27 पोलिस कॉन्स्टेबल्स, 2 महिला पोलिस, तर 8 अतिरिक्त आयआरबी पोलिसांची वर्णी लावण्यात आली आहे.