नवी दिल्ली : भाजपचे वरिष्ठ नेते बी. एल. संतोष यांना पुष्पगुच्छ देताना मंत्री सुदिन ढवळीकर. बाजूला मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर. Pudhari File Photo
गोवा

दिल्ली दरबारी आघाडीतील ‘बिघाडी’

ढवळीकर बंधूंनी घेतली बी. एल. संतोष यांची भेट : भाजप बॅकफूटवर

पुढारी वृत्तसेवा

पणजी : राज्यातील आघाडीतील बिघाडीचे पडसाद दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. आपल्याला मगो पक्षाची गरज नाही, अशी गर्जना करत भाजपच्या काही नेत्यांनी वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. त्यानंतर लगेचच मगोपच्या नेत्यांनी दिल्ली गाठत हा विषय ‘एनडीए’चे नेतृत्व करणार्‍या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत नेला.

सध्या मगो ‘एनडीए’चा घटक पक्ष आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपला ‘एनडीए’ मधून कोणीही बाहेर पडलेले नको आहे. याचा परिणाम केवळ गोव्यापुरता मर्यादित न राहता तो देशपातळीवर होऊ शकतो. याची योग्य ती काळजी घेत राज्यातील नेत्यांना सुनावल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यातील भाजपच्या नेत्यांनी बॅकफूटवर येत, सध्या मगोप बरोबर युती असून, ती यापुढेही असेल, असे जाहीर करणे भाग पडले. राज्यात भाजपला काठावरचे बहुमत होते, त्यावेळी भाजपने अपक्ष आणि मगोपच्या साहाय्याने सत्ता स्थापन केली होती. आता आमदारांची संख्या वाढल्याने त्यात बदल झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्याची सुरुवात मांद्रे मतदारसंघापासून झाली. या मतदारसंघात भाजपचा उमेदवार असेल, असे जाहीर केले. त्यानंतर प्रियोळमध्येही तेच घडले. येथेही मगोला डिवचण्यात आले. त्यानंतर मगोच्या नेत्यांनीही तीव्र प्रतिक्रिया अथवा आदळआपट न करता सरळ दिल्ली गाठली.

सध्या अनेक राज्यांच्या निवडणुका येणार आहेत. त्या ठिकाणी भाजप इतर घटक पक्षांच्या मदतीने सत्तेत आहे. त्यात बिहारचा क्रमांक अगदी वरचा आहे. त्यामुळे ‘एनडीए’तील कुठल्याच घटक पक्षाला दुखावणे भाजपला डोईजड होऊ शकते. याची जाणीव केंद्रीय समितीला आहे. त्यामुळे त्यांनी मगोच्या नेत्यांना तातडीची भेट देत, चर्चा केली. त्याचा परिणाम राज्यात जाणवला. संबंधित नेत्यांनी आपली विधाने बदलत सध्या मगोसह युती असल्याचे जाहीर केले.

युतीबाबत आताच बोलणे अयोग्य : नाईक

भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक म्हणाले, मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत पक्षाची व आपली भूमिका आपण केंद्रीय नेतृत्वाकडे मांडलेली आहे. पक्ष जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल. मगो पक्षासोबतच्या युतीबाबत आताच काही बोलणे योग्य होणार नाही. युतीबाबत योग्यवेळी योग्य ती भूमिका पक्ष जाहीर करेल, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT