Marathi Language 
गोवा

Marathi Language | कोकणीबरोबर मराठीला राजभाषेचा दर्जा द्या

Marathi Language | धारगल ग्रामसभेत एकमुखी ठराव; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पाठवणार समर्थनपत्र

पुढारी वृत्तसेवा

पेडणे : पुढारी वृत्तसेवा
राज्यात कोकणी भाषेबरोबरच मराठी भाषाही राजभाषेचा दर्जा देण्यात यावा, या मागणीला पाठिंबा देणारा ठराव धारगल ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत एकमुखीने मंजूर करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश धुमाळ यांनी हा ठराव मांडला. या मागणीसंदर्भातील समर्थनपत्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पाठवण्याची सूचना त्यांनी केली. पुंडलिक धारगलकर यांनी ठरावाला अनुमोदन दिले.

ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच अर्जुन कानोलकर होते. यावेळी पंच सदस्य सतीश धुमाळ, दाजी शिरोडकर, दिलीप वीर, पंचायत सचिव प्रीतम सावंत आणि निर्वाचन अधिकारी राजाराम कामत उपस्थित होते.

प्रकाश धुमाळ यांनी सादर केलेल्या ठरावप्रत्रात मराठी भाषा सांस्कृतिक आणि साहित्यिक परंपरेत महत्त्वाचे स्थान असल्याचे नमूद केले. संत साहित्य, नाटक, कीर्तन, भजन तसेच विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कलाप्रकारातून मराठीने गोव्याच्या सामाजिक जीवनात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे, त्यामुळे मराठी भाषाला राजकीय आणि प्रशासकीय मान्यता मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.

या मागणीच्या समर्थनार्थ मुख्यमंत्री, मंत्री आणि आमदारांना निवेदने देण्यात आली असून, विविध पंचायतींनी समर्थनाचे ठराव घेतले आहेत. १३७ कीर्तनकारांनी स्वतंत्र निवेदनादारे मागणीला पाठिंबा दर्शविला आहे. लाखो मराठी साहित्यिक आणि मराठीप्रेमींच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन राष्ट्रपतींना सादर करण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांनी सादर केलेले पत्र पंचायत सचिव प्रीतम सावंत यांनी ग्रामसभेत वाचून दाखवले. चर्चेत ज्येष्ठ मराठीप्रेमी आणि नाटककार रोहिदास हरमलकर तसेच पुंडलिक धारगलकर यांनी सहभाग घेतला.

मराठी भाषेतून शिक्षण घेतलेल्या अनेक पिढ्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक परंपरा जपली आहे. मराठीच्या माध्यमातून संस्कार, साहित्य आणि सांस्कृतिक मूल्ये पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याच्या मागणीचा कोकणी भाषाला विरोध करण्याचा कोणताही उद्देश नाही, कोकणीचेही जतन आणि संवर्धन होणे आवश्यक असून, दोन्ही भाषांचे अस्तित्व आणि सांस्कृतिक परंपरा टिकून राहणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पंचायत कार्यालयाशारील जागेचा विकास रक्षकला

ग्रामसभेत पंचायत कार्यालयाशेजारील जागेच्या विकासाचा विषयार्थी उपस्थित झाला. या जागेवर दुकाने आणि इतर कार्यालये बांधण्याचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी होता. त्यासाठी संरक्षक भिंतही उभारण्यात आली होती. मात्र, पुढे काम झाले नाही, असा प्रश्न पुंडलिक धारगलकर यांनी उपस्थित केला. संबंधित जमीनमालकाशी पंचायत प्रशासनाची बोलणी सुरू असल्याचे पंचायत सचिव प्रीतम सावंत यांनी सांगितले.

स्मशानभूमीचा विषयही प्रलंबित

धारगल पंचायत क्षेत्रातील स्मशानभूमीचा विषयही अनेक ग्रामसमानांमध्ये मांडूनही प्रलंबित असल्याचे धारगलकर यांनी निदर्शनास आणले. सुकेकुळण धारगल येथे क्रीडा मैदान बांधण्यात येत असून, तिथे स्मशानभूमीसाठी जागा मागण्यात आली. मात्र, त्याला अद्याप सरकारची मान्यता मिळालेली नसल्याने सचिव सावंत यांनी सांगितले. सरकार दरबारी लवकरात लवकर पडताळणी करून काम सुरू करण्याची सूचना धारगलकर यांनी केली. पंच सतीश धुमाळ यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT