Dhangar Reservation  File Photo
गोवा

Goa Dhangar Reservation | धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सकारात्मक आश्वासन!

Goa Dhangar Reservation | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आश्वासन : शिष्टमंडळाशी चर्चा

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले. धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने शहा यांची भेट घेऊन चर्चा केली.

भाजपच्या नवीन भवनाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, धनगर समाजाच्या प्रतिनिधींनी आणि समाजबांधवांनी भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची भेट घेऊन आपल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधले.

अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा मिळण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी आम्हाला दिल्लीत कधी नेणार आणि आमच्या या महत्त्वाच्या विषयावर केंद्र सरकारकडे कधी पाठपुरावा करणार, असा थेट प्रश्न करून धनगर बांधवांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

दिल्लीत केंद्रीय नेतृत्वासोबत महिनाभरात ही भेट घडवून आणणार का, असे विचारत मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास शांत न बसण्याचा इशारा समाज प्रतिनिधींनी दिला.
धनगर समाजाचे अध्यक्ष बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. गेल्या २३ वर्षांपासून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळवून देण्यासाठी सातत्याने लढा सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

शहा यांचा सकारात्मक प्रतिसाद

धनगर समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या समस्या आणि भावना चांगल्या प्रकारे समजून घेतल्याचे सांगत, या प्रकरणावर योग्य तो तोडगा काढण्याचे सकारात्मक आश्वासन दिले.

या प्रलंबित विषयावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालय सकारात्मक पावले उचलेल, असा विश्वास शिष्टमंडळाने व्यक्त केला. भाजप नेत्यांनीही वरिष्ठ पातळीवर चर्चा करत लवकरच दिल्लीत उच्चस्तरीय बैठक आयोजित करून या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन धनगर प्रतिनिधींना दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT