गोवा

Goa Dhangar Community | मोले येथे धनगर समाजाचा एसटी आरक्षणासाठी निर्धार मेळावा

Goa Dhangar Community | धनगर समाजाला निश्चित एसटी दर्जा मिळेल

पुढारी वृत्तसेवा

  • शांततामय, संघटितपणे लढा देण्याचे आवाहन

  • सरकारकडून समाजाला मागणीपूर्तीच्या अपेक्षा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा मिळवून देण्यासाठी आजपर्यंतच्या आठ मुख्यमंत्र्यांनी सहकार्य केले आहे. विद्यमान सरकारकडूनही समाजाच्या अपेक्षा वाढल्या असून, सरकार निश्चितपणे धनगर समाजाच्या मागणीची दखल घेऊन एसटी दर्जा जाहीर करेल, असा विश्वास गोमंतक धनगर समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बाबू कवळेकर यांनी व्यक्त केला. यासाठी समाजाने शांततामय मार्गाने संघटितपणे लढा देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मोले येथे धारबांदोडा तालुक्यातील गोमंतक धनगर समाजोन्नती मंडळाच्या वतीने एसटी आरक्षण निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. बाबू कवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत ते बोलत होते.


यावेळी धारबांदोडा तालुका अध्यक्ष दुलबा पाटकर, माजी अध्यक्ष जानू दमेकर, मनीष लांबोर, डॉ. जानू झोरे, डॉ. राजन लांबोर, चंद्रकांत शिंदे, मोलेच्या उपसरपंच जनी दमेकर, पंच वर्षा झोरे, वाघा मिसाल, विठोबा खरात तसेच अन्य समाजबांधव उपस्थित होते.

धनगर समाजाने एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळाल्याचे स्वागत केले आहे. समाजाच्या एसटी दर्जाच्या मागणीसाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, त्यामुळे आपल्याला निश्चितपणे एसटी दर्जा मिळेल, असा विश्वास कवळेकर यांनी व्यक्त केला.

समाजबांधव सध्या शांततामय पद्धतीने बैठका घेऊन जनजागृतीवर भर देत आहेत. या लढ्यात प्रत्येक समाजबांधवाने सक्रिय सहकार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कुळे पंचायतीचे माजी सरपंच मनीष लांबोर यांनी धनगर समाजाच्या एसटी दर्जाच्या मागणीबाबत सरकारकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला.

एसटी दर्जा मिळवण्यासाठी समाजबांधव एकत्रित असून, सरकारच्या भूमिकेला योग्य पद्धतीने उत्तर देण्यास सक्षम आहेत, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री आगामी काळात गोव्यात येणार असल्याने त्यापूर्वी धनगर समाजाला एसटी दर्जा जाहीर करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

उन्नतीसाठी दर्जा हवाच : दमेकर

मोले पंचायतीच्या उपसरपंच जनी दमेकर यांनी समाजाच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी एसटी दर्जा मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. एसटी दर्जासाठी समाजबांधव एकत्रितपणे लढा देण्यास सज्ज झाले असून, सरकारने आता या मागणीची गंभीरतेने दखल घेण्याची वेळ आली आहे, असे डॉ. जानू झोरे यांनी नमूद केले.

मागणी पूर्ण होईपर्यंत हा लढा सुरूच ठेवा : डॉ. झोरे

डॉ. जानू झोरे यांनी एसटी समाजाला विविध घटनात्मक अधिकार व सवलती मिळत असून, त्याचा लाभ धनगर समाजालाही मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून समाजबांधव आपल्या हक्कासाठी सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत. मागणी पूर्ण होईपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT