पेडणे : धनगर समाजाचा अनुसूचित जमात (एसटी) प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीला अधिक बळ देण्यासाठी गोमंतक धनगर समाजोन्नती मंडळ, पेडणे तालुका यांच्या वतीने तोरसे धनगरवाडा येथे जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला समाजातील पदाधिकारी, सदस्य, महिला वर्ग तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी एसटी दर्जा मिळविण्यासाठी संघटितपणे आणि अधिक तीव्रतेने लढा उभारण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त करण्यात आला.
सभेच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष बाळू शिंदे होते. उपाध्यक्ष तथा तोरसे ग्रामपंचायतीचे सदस्य रमेश गंगाराम बुटे यांच्यासह समाजातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित वक्त्यांनी धनगर समाजाच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या एसटी दर्जाच्या मागणीचा आढावा घेतला. समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाल्यास शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय आणि शासकीय योजनांचा लाभअधिक प्रभावीपणे मिळू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
समाजातील युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन ही लढाई अधिक संघटितपणे पुढे नेण्याची गरज असल्याचेही वक्त्यांनी स्पष्ट केले. सभेत समाजातील प्रत्येक घटकाने वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. शासनाकडे विविध मार्गानी पाठपुरावा सुरू ठेवण्याबरोबरच आवश्यक ते लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची तयारी ठेवण्यावर भर देण्यात आला. महिला वर्गानही या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविण्याची तयारी दर्शविली.
ही मागणी पूर्ण होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. आगामी काळात पेडणे तालुक्यातील विविध भागांत अशाच जनजागृती सभा आयोजित करून जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.