National Convention of Rashtriya OBC Mahasangh Goa
गोवा: माझ्यावर ओबीसी समाजाबद्दल बोललो म्हणून टीका केली जाते, मला टार्गेट केले जात आहे. पण मी कुठल्याही एका समाजाबद्दल बोलत नाही. मला कितीही टार्गेट केले तरी ओबीसी समाजाच्या हक्कासाठी मी लढतच राहणार आहे, मी ती लढाई कधी थांबवणार नाही, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.७) स्पष्ट केले. जोपर्यंत ओबीसी समाज प्रगतीच्या मुख्य प्रवाहात येत नाही, तोपर्यंत प्रगत भारताचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
गोवा येथे आयोजित 'राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या 10व्या राष्ट्रीय महाअधिवेशन'चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, ओबीसी महासंघाची सुरुवात 2005 साली एका छोट्या खोलीतून झाली. त्यावेळेपासून मी राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत काम करत आहे. क्रिमी लेयरची मर्यादा केवळ १ लाख होती. संघर्षानंतर ही मर्यादा वाढवली गेल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने संधी मिळाल्यानंतर ओबीसी समाजासाठी चांगले निर्णय घेण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. आतापर्यंत ५० हून अधिक निर्णय ओबीसी समाजाच्या हितासाठी घेण्यात आले आहेत. त्यामागे ओबीसी महासंघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा मोठा वाटा आहे.
फडणवीस म्हणाले की, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ५४ हॉस्टेल सुरू केली आहेत. ओबीसी मुला-मुलींना उच्च शिक्षणासाठी परदेशी शिष्यवृत्तीही सुरू करण्यात आली आहे. 2020 मध्ये ओबीसींचे राजकीय आरक्षण काढून घेतले गेले होते, मात्र 2022 मध्ये सुप्रीम कोर्टात लढून पुन्हा परत 27 % आरक्षण मिळवण्यात यश आले. पंतप्रधान कोणत्याही जातीचे नसतात, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील ओबीसी आहेत. त्यांनी भारताला जगातील चौथ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनवले आहे. त्यांनी ओबीसींसाठी सात महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सर्वाधिक ओबीसी मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत. एखाद्या समाजासाठी लढतो म्हणजे दुसऱ्याच्या विरोधात असा अपप्रचार केला जातो, हे खूप दु:खद आहे, असेही त्यांनी नमूद केले.
फडणवीस यांनी स्पष्ट केले की, यावेळी नव्या मागण्या सरकारकडे आल्या असून त्यात काही मागण्या केंद्र सरकारकडे आहेत, तर काही राज्य सरकारकडे. गोवा सरकारकडे २५ मागण्या सादर करण्यात येणार असून, कुठेही निधीची कमतरता पडू देणार नाही, असा विश्वास त्यांनी दिला.
याशिवाय त्यांनी नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघासाठी भव्य ओबीसी भवन उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले. लवकरच या वास्तूचे काम सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थितांनी परिणय फुके यांना ओबीसी समाजाचा मंत्री बनवण्याची मागणी केली. त्यावर फडणवीस म्हणाले, अनेक लोक त्यांना मुख्यमंत्री समजतात, त्यांची लोकप्रियता हीच त्यांच्या कार्याची साक्ष आहे.