पणजी : पुढारी वृत्तसेवा
संगीत हे आपले विचार प्रकट करण्यासाठी सर्वात प्रभावी माध्यम आहे. पर्यटन विभाग म्हणून आम्ही गोवा बियाँड बीचेस ही संकल्पना राबवत आहोत. याच पार्श्वभूमीवर देव बरे करू या गीताने ही गोव्याची खरी ओळख संस्कृती आणि वारसा आपल्या सादरीकरणातून दाखवला आहे.
या गाण्याच्या उभारणीसाठी विनायक प्रभू, सर्व गायक आणि सहकार्य केलेले श्रीकांत बापट यांचे विशेष आभार, असे प्रतिपादन पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी केले. देव बरे करू हे केवळ एक गीत नाही, तर ते हृदयस्पर्शी संगीतमय सादरीकरणात गुंफलेल्या भावपूर्ण शब्दांचा एक गुच्छ आहे.
या गाण्याचा मुख्य उद्देश गोवा आणि गोव्याच्या लोकांची खरी पारंपरिक, प्रेमळ संस्कृती प्रतिबिंबित करणे हा आहे. हेमा सरदेसाई, लॉरी त्रावासो, सोनिया शिरसाट, गौतमी हेदे बांबोळकर, प्रद्युम्न प्रभुदेसाई, नैशा मस्कारेन्हास, सिद्धनाथ बुयांव या गायकांसह सर्वांनी G09 यात आपले मन ओतले आहे.
संगीत दिग्दर्शक सिद्धनाथ बुयांव, कोकणी गीतकार साईश पै पाणंदिकर आणि इंग्रजी गीतकार नैशा मस्कारेन्हास यांनी या गीताची रचना केली आहे, तर व्हिडिओ आणि संपादन सतीश गावस यांनी केले आहे. देव बरे करू ही विनायक प्रभू यांची एक अप्रतिम संकल्पना असून, त्याला लॅबइंडियाचे श्रीकांत बापट यांनी पाठिंबा दिला आहे.
ही संपूर्ण संकल्पना अनेक प्रतिष्ठित व्यक्तींच्या मदतीने साकार झाली आहे. याचे अनावरण गोव्याचे पर्यटन आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन ए. खंवटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलताना राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे म्हणाले की, देव बरे करू हे केवळ एक गीत नसून जागतिक नागरिकांच्या समुदायासमोर गोव्याच्या सादरीकरणाचे, परंपरेचे आणि संस्कृतीचे उत्तम उदाहरण आहे.
हेमा सरदेसाई म्हणाल्या की, त्या स्वतः या संकल्पनेने मंत्रमुग्ध झाल्या आणि त्यांनी तात्काळ यात सामील होण्याचा निर्णय घेतला. हे गाणे हृदयस्पर्शी भावनांची लाट निर्माण करणार असल्याचा विश्वास सर्व गायकांना आहे.
या गाण्यासाठी मुंबईहून गोव्यात आलेले मिलिंद गुणाजी म्हणाले की, हे गाणे आणि त्यातील भावना सर्वांसाठी खुल्या आहेत आणि ते व्हायरल केले जाऊ शकते व डाउनलोडही केले जाऊ शकते, कारण हे खऱ्या अर्थान प्रत्येकासाठी गोव्याचे गीत आहे. दरम्यान, यावेळी लॅबइंडियाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक सायकलचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या किमतीत हे वाहन उपलब्ध करून देण्याचा मानस एमडी श्रीकांत बापट यांनी व्यक्त केला.