पणजी : पुढारी वृत्तसेवा
कॅसिनोसमोरील दुभाजकावरील कापलेले स्टीलचे बॅरिकेडस् पर्यटकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत असून, वाहनचालकांसाठीही डोकेदुखी बनले आहेत. पणजी शहरातील डी. बी. बांदोडकर मार्गावर मांडवी नदीत मोठेमोठे कॅसिनो उभे आहेत. या कॅसिनोंमध्ये जाण्यासाठी नदीकिनारी रस्त्यालगत कार्यालये उभारण्यात आली आहेत.
कॅसिनोमध्ये जाण्यापूर्वी पर्यटकांना या कार्यालयांमध्ये जाऊन आवश्यक सोपस्कार पूर्ण करावे लागतात. त्यानंतर त्यांना बोटीतून मांडवी नदीतील कॅसिनोपर्यंत नेले जाते. मात्र, रस्त्याच्या पलीकडे असलेल्या या कार्यालयांमध्ये जाण्यासाठी पर्यटकांना डी. बी. बांदोडकर मार्ग ओलांडावा लागतो.
हा एकदिशा मार्ग असल्याने रस्ता ओलांडताना सुरक्षितता राहावी, यासाठी सरकारने रस्त्याच्या दुभाजकावर स्टीलचे बॅरिकेडस् उभारले आहेत. मात्र, एका ओळीने कॅसिनोंची कार्यालये असल्याने ज्या कार्यालयासमोर झेब्रा क्रॉसिंग आहे, तिथूनच बहुतांश पर्यटक रस्ता ओलांडतात. त्यामुळे इतर कॅसिनोच्या कार्यालयांमध्ये जाणाऱ्या पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागतो.
यावर काही कॅसिनो मालकांनी शक्कल लढवत आपआपल्या कार्यालयांसमोरील दुभाजकावरील स्टीलचे बॅरिकेडस् कापून रस्ता मोकळा केल्याचे दिसून येत आहे. मात्र, अशा प्रकारे बेकायदेशीररीत्या दुभाजक मोकळा केल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
दुभाजकावरील बॅरिकेडस् कापलेल्या ठिकाणी कोणतेही अधिकृत झेब्रा क्रॉसिंग नसतानाही पर्यटक मोकळ्या जागेतून अचानक रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे भरधाव किंवा अचानक येणाऱ्या वाहनांमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे.
भविष्यात अशा प्रकारामुळे जीवित तसेच वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने तसेच सरकारने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन कापलेले बॅरिकेडस् पूर्ववत करावेत आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.