Yuri Alemao File Photo
गोवा

Cuncolim Yuri Alemao Congress | कुंकळ्ळीत युरी आलेमाव यांचा मार्ग मोकळा?

Cuncolim Yuri Alemao Congress | अनेक वर्षांपासून राहिला आहे काँग्रेसचा बालेकिल्ला; गेली साडेचार वर्षे आहे युरींचा प्रभाव

पुढारी वृत्तसेवा

सासष्टी : विठू सुकडकर

मतदार सासष्टी तालुक्यातील आठ संघांपैकी कुंकळ्ळीचा मतदारसंघही अनेक वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून परिचित आहे. मध्यंतरी १९९४ मध्ये युगोडेपाचे आरेसियो डिसोझा व २०१२ मध्ये भाजपाचे राजन नाईक यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला कुंकळ्ळीत खिंडार पाडले होते. त्यानंतर माजी मंत्री ज्योकिम आलेमाव यांनी विजय प्राप्त करून काँग्रेसला बालेकिल्ला परत मिळवून दिला. सध्या त्यांचे पुत्र विरोधी पक्षनेते युरी आलेमाव गेली साडेचार वर्षे कुंकळ्ळी मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीकडे लक्ष वेधले असता सध्याच्या स्थितीत युरींचे आसन बळकट दिसते. माजी मंत्री ज्योकीम आलेमाव यांच्यानंतर काँग्रेसतर्फे क्लाफासियो डायस यांनी एक कुंकळ्ळी मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. परंतु भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली. सध्या क्लाफासियो डायस हे भाजपातच आहेत. त्या काळात युरी आलेमाव यांनी सांगे मतदारसंघातून गोवा फॉरवर्डच्या उमेदवारीवर विधानसभा निवडणूक लढविली होती. २०२२ मध्ये योग्यवेळी काँग्रेस पक्षात प्रवेश करून त्यांनी कुंकळ्ळी मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि यशस्वी झाले.

माजी मंत्री ज्योकीम आलेमाव व युरी आलेमाव या पिता पुत्रांनी कुंकळ्ळीसाठी भरीव योगदान दिलेले आहे. सामाजिक विकासाबरोबरच त्यांनी लोकांचा वैयक्तिक विकास प्राधान्याने केलेला आहे. मतदारसंघातील तरुण पिढीला मोठ्या प्रमाणात रोजगार, स्वयंरोजगार मिळवून दिलेला आहे. युरी आलेमांव यांना पिता ज्योकीम आलेमाव यांचे योगदान जमेची बाजू ठरलेले आहे. तसेच युरी आलेमांव हे विकासाच्या अनुषंगाने म्हणा किंवा जनकल्याण इत्यादी कार्यक्रमातून लोकसंपर्कात आहेत. त्याशिवाय विरोधी पक्षनेतेपद त्यांची जमेची बाजू आहे.

या सर्व गोष्टी त्यांना मतदारसंघाच्या विकासासाठी उपयोगी पडत आहेत. राज्यात भाजपाचे सरकार सत्तेवर असले, तरी कुंकळ्ळी मतदारसंघात युरी आलेमाव यांचे वर्चस्व आहे. क्लाफासियो डायस हे भाजपाचे माजी आमदार असले, तरी मतदारसंघात ते सक्रिय असलेले दिसत नाहीत. भाजपाचे कार्यकर्तेही शांत आहेत. कुंकळ्ळी पालिकाही युरी आलेमांव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे.

सामान्य लोक कामे करून घेण्यासाठी युरी आलेमांव यांच्या कार्यालयाकडे धाव घेताना दिसतात. या प्रभावामुळे कुंकळ्ळी मतदारसंघात सत्ताधाऱ्यांसह युरींचे पक्षांतर्गत विरोधकही फिके पडलेले आहेत. यापूर्वी माजी सनदी अधिकारी एल्विस गोम्स यांनी आपच्या उमेदवारीवर विधानसभा निवडणूक लढविली होती. ते तसे सक्रिय नेते आहेत. सध्या ते काँग्रेस पक्षात आहेत. कुंकळ्ळीत परवाच काही लोकांचा एक वेगळाच गट तयार झालेला आहे. तेथील व्यापारी संघटनेचा त्या गटाला पाठिबा आहे.

या वेगळ्या गटाला एल्विस गोम्स यांनी कुंकळ्ळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवावी अशी इच्छा आहे. पण एल्विस गोम्स सध्या काँगेस पक्षात असल्याने आणि कुंकळ्ळीचे विद्यमान आमदार तथा विरोधी पक्षनेते युरी आलेमांव हे काँगेस पक्षात असल्याने त्यांनाच उमेदवारी मिळणार हे स्पष्ट आहे. एल्विस गोम्स यांना विधानसभा निवडणूक लढवायची असेल, तर काँग्रेसचा पक्षत्याग करावा लागेल. पण अजूनपर्यंत एल्विस गोम्स काँग्रेस पक्षात असून आपण अन्य कुठल्या पक्षाच्या उमेदवारीवर विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केलेली नाही.

कुंकळ्ळी मतदारसंघात भाजपाचे कार्यकर्ते सध्या बघ्याची भूमिकेत आहेत. पक्षातर्फे कोणीही जोमाने काम करताना दिसत नाही. नगरसेवक विशाल देसाई तसेच सुदेश भिसे हे मतदारसंघात स्वबळावर काम करताना दिसतात. त्यांना भाजपची उमेदवारी मिळणार याची शाश्वती नाही. माजी आमदार क्लाफासियो हे सध्या नाममात्र भाजपात आहेत. ते पूर्वीप्रमाणे मतदारसंघात सक्रिय असलेले दिसत नाहीत.

बहुतेक आगामी विधानसभा निवडणूक ते आपच्या उमेदवारीवर लढविण्याची शक्यता आहे. २०२२ मध्ये आपच्या उमेदवारीवर प्रशांत नाईक यांनी विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी सुमारे हजारभर मते मिळविली होती. ते मतदारसंघात सक्रिय असून आपचे सक्रियपणे कार्य करताना दिसत आहेत. डॉ. जर्सन फर्नाडिस यांनी मागे दोनवेळा कुंकळ्ळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविलेली आहे. ते एक इच्छुक उमेदवार असल्याचे बोलले जाते.

परंतु निवडणुकीच्या अनुषंगाने कुंकळ्ळी मतदारसंघात काहीच हालचाली सुरू असल्याचे दिसत नाहीत. तसेच दोन वर्षांपूर्वी पोलिस सेवेतून निवृत्त झालेले माजी पोलिस अधीक्षक सॅमी तावारीस हे देखील इच्छुक उमेदवार असल्याचे बोलले जाते; परंतु त्यांच्याकडूनही निवडणूक लढविण्यास कोणत्याही सक्रिय हालचाली दिसून येत नाहीत. रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षात सध्या फुटीचे राजकारण सुरू आहे. मागे आरजीपीच्या उमेदवारीवर विल्सन कार्दोज यांनी निवडणूक लढविली होती. सुमारे अडीच हजार मते त्यांनी मिळवली होती. सध्या मतदारसंघात त्यांचे सक्रिय कार्य दिसत नाही.

गोम्स यांना पाठिंबा देण्याची चर्चा

डॉ. जर्सन फर्नांडिस आणि माजी पोलिस अधीक्षक सॅमी तावारीस या दोघांनी आगामी विधानसभा निवडणुकीत माजी सनदी अधिकारी एल्विस गोम्स यांना पाठिंबा देण्याचे ठरवल्याची चर्चा आहे. तसेच एल्विस गोम्स यांनी गोवा फॉरवर्ड किंवा अन्य कुठल्या नवीन पक्षांच्या उमेदवारीवर विधानसभा निवडणूक लढवावी, अशी त्या दोघांची इच्छा आहे. गोम्स यांनी काँग्रेसचा त्याग करून स्वतंत्रपणे आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास युरी आलेमाव यांना किंचित संघर्ष करावा लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT