प्रभाकर धुरी
पणजी : गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वांना लळा लावलेल्या ओंकार या निमवयस्क हत्तीला वनतारात तात्पुरता नेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिले होते.यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.मात्र,ओंकारला पकडण्याच्या कार्यवाहीबाबत वनताराकडून वनविभाग आणि सरकारच्या पत्रांना योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती वन विभाग व राज्य सरकारने न्यायालयाला दिली.
कोल्हापूर येथील न्यायालयात दाखल याचिकेवर निर्णय दिल्यावर न्यायालयाने निर्देशांसाठी आज,सोमवारची तारीख ठेवली होती. वनताराकडून पत्रांना प्रतिसाद मिळत नाही,पुन्हा आज प्रयत्न करतो आणि उद्या माहिती देतो, असे सरकारतर्फे आज न्यायालयात सांगण्यात आले.मात्र,न्यायालयाने येत्या सोमवारपर्यंत मुदत देत सोमवार, दि.1 डिसेंबर रोजी उच्च स्तरीय समिती व अन्य तपशील देण्याचे आदेश दिले.
वनताराची ओंकारला पकडण्यासाठीची तयारी व पूर्ततेबाबतचा तपशीलवार अहवाल सोमवारी सादर करण्यास सांगितले होते. याबाबत वनविभागाने वनताराशी संपर्क साधला.मात्र,त्यांच्याकडून अजून उत्तर न आल्याचे न्यायालयात सांगितले.यावर महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उच्चस्तरीय समिती स्थापनेबाबत केंद्र सरकारशी त्वरित संपर्क करून येत्या सोमवारपर्यंत संपूर्ण अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले. वनतारा च्या साहाय्याने फक्त अर्ध्या तासात ओंकार हत्ती पकडणे शक्य आहे, असे वनविभागाने न्यायालयाला सांगितले होते.प्रत्यक्षात वनताराकडून सरकारला मात्र थंडा प्रतिसाद मिळतो आहे.कदाचित वनताराला ओंकार हत्ती कायमस्वरूपी हवा असावा; मात्र न्यायालयाने त्याला तात्पुरता नेण्याचे आदेश दिले आहेत.ओंकारचे पुनर्वसन आणि स्थलांतराबाबत उच्चस्तरीय समिती निर्णय घेणार आहे.