पणजी : राज्यात सध्या सरकारी नोकरीवरून भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे पुढे येत आहेत. रोज नव्याने नवी नावे उघड होत आहेत. नोकरीच्या आमिषाने लाखो रुपये उकळणार्या पूजा नाईकला अटक केल्यानंतर दिवसेंदिवस या प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढत आहे. पोलिस सागर नाईक नंतर निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी प्रकाश राणे यांच्यानंतर आता सचिवालयातील दोन कर्मचार्यांची नावे समोर आली आहेत. या कर्मचार्यांना नोटीस पाठवून चौकशी सुरू केल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली. दक्षता खात्यातर्फे भ्रष्टाचार विरोधी जनजागृती आठवड्याचे आयोजन केले आहे. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, सरकारी नोकरीच्या आमिषाने लाखो रुपयांना गंडा घालणार्या पूजा नाईक हिला अटक करून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीत रोज नवनवीन बाबी लक्षात येत आहेत. या पूजा नाईककडे आलिशान महागड्या गाड्या, 4-5 प्लॅट असून तिने आठ ते दहावेळा विदेशी दौरे केल्याची माहिती समोर आली आहे. पूजा नाईकची अधिक चौकशी केली असता, आणखी काही सरकारी कर्मचार्यांची नावे पुढे आली आहेत. हे सरकारी कर्मचारी सचिवालयात काम करणारे आहेत. पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे स्पष्ट होत आहे.
राज्य भ्रष्टाचार मुक्त राहावे आणि कोणत्याच प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये, यासाठी सरकार पातळीवर दक्षता खात्याच्या वतीने विविध प्रयत्न केले जातात. याचाच भाग म्हणून 28 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान जनजागृती आठवड्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह अर्थ खात्याचे सचिव कन्हावेलू, दक्षता आयोगाच्या संचालिका यशस्वीनी बी., पोलीस अधीक्षक नेल्सन अल्बुकर्क उपस्थित होते.
राज्य सरकारकडून भ्रष्टाचार विरोधात कडक पावले उचलण्यात आली, असून ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ हे आपले ब्रीद आहे. भ्रष्टाचार मुक्त राज्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यापुढे सरकारी अधिकारी, कर्मचारी यांनी अधिक सतर्क राहावे. भ्रष्टाचारात कोणी राजकारणी, प्रशासकीय अधिकारी अथवा कोणीही असले तरी त्याची गय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्याध्यापिकेला अटक
फोंडा ः माशेलमधील एका विद्यालयात शिक्षिकेची नोकरी देतो, असे सांगून उसगावातील एका महिलेकडून 15 लाख रुपये लुटलेल्या सागर सुरेश नाईक याची सध्या कसून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी मुख्याध्यापिका सुनीता पाऊस्कर हिला अटक करण्यात आली असून मास्टरमाईंड दीपश्री सावंत-गावस बेपत्ता असून तिचा शोध घेण्यासाठी फोंडा पोलिसांनी ‘लुक आऊट’ नोटीस बजावली आहे.
दरम्यान,पा ऊस्कर हिला आरोग्याच्या कारणामुळे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, पुढील सात दिवस पोलिस स्टेशनमध्ये हजर राहून तपासात सहकार्य करावे, अशी अट न्यायालयाने घातली आहे.