मडगाव : राज्यात भाजपविरोधी राजकीय शक्तींना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही वर्षांतील पक्षांतरांचा संदर्भ देत गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी काँग्रेसवर थेट निशाणा साधत काँग्रेस पुन्हा पक्षांतरांची 'हॅट्रिक' करण्याची भीती जनतेच्या मनात निर्माण झाल्याचा खळबळजनक दावा केला आहे. काँग्रेससोबतची आघाडीची चर्चा तूर्तास बंद झाल्याचे जाहीर करत सरदेसाई यांनी विरोधकांच्या संभाव्य एकजुटीसमोरच नवे राजकीय आव्हान उभे केले आहे.
रविवारी प्रसारमाध्यमांजवळ ते बोलत होते. सरदेसाई यांनी काँग्रेसच्या विश्वासार्हतेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आगामी राजकीय समीकरणे निश्चित करण्यापूर्वी काँग्रेसने जनतेचा आणि संभाव्य मित्रपक्षांचा गमावलेला विश्वास पुन्हा संपादन करणे आवश्यक आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. सरदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2022 -2027 या कालावधीत आघाडी टिकवण्यासाठी अथवा पर्यायी व्यवस्था करण्यासाठी आम्ही वचनबद्ध होतो. मात्र, भूतकाळातील कटू अनुभव, तसेच काँग्रेसकडून दिलेला शब्द पाळला जात नसल्याने आमच्या पक्षाने आघाडीची बोलणी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या आमच्यात कोणतीही चर्चा सुरू नसून, हे प्रकरण तूर्तास बंद झाले आहे असे सांगितले.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सोमवारी होणाऱ्या गोवा भेटीच्या पार्श्वभूमीवर सरदेसाई यांच्या या वक्तव्याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. गोव्यात भाजपविरोधी राजकीय शक्तींना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांना काँग्रेसकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळत आहेत.
केवळ निवडणुकीपूर्वी एकत्र येणे, शक्तींना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांना काँग्रेसकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळत आहेत. एक चिन्ह दाखवणे आणि जनतेने ते स्वीकारावे अशी अपेक्षा करणे आता गोव्यात चालणार नाही, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले. जनतेचा गमावलेला विश्वास पुन्हा संपादन करणे ही काळाची गरज आहे.
भाजप सरकारला पर्याय देणे अत्यंत आवश्यक असले तरी त्यासाठी आधी जनतेचा विश्वास जिंकावा लागेल. स्थानिक पातळीवरील कामांचा दाखला देत सरदेसाई यांनी नगरपालिका प्रशासनावरही टीका केली आहे. नगरपालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे स्वतःच्या पैशाने विहिरीची स्वच्छता करावी लागल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांनी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्वतःच्या हिमतीवर लोकांपर्यंत जाणार
स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'बॅकडोअर' पद्धतीने पदे देण्याच्या राजकारणालाही सरदेसाई यांनी विरोध केला. स्थानिक निवडणुकांसाठी मुलीच्या 'बॅरिस्टर' पदवीदान समारंभालाही जाणे टाळले. सध्या मी पूर्णपणे स्वतंत्र असून स्वतःच्या हिमतीवर लोकांपर्यंत जाणार आहे, असे आमदार विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले. सरदेसाई यांच्या या भूमिकेमुळे गोव्यातील विरोधकांच्या संभाव्य आघाडीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांमधील राजकीय दुरावा आगामी काळात कितपत वाढतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.