मडगाव : पुढारी वृत्तसेवा
गोवा फॉरवर्ड 'नको' म्हणत युती आणि विलीनीकरणाच्या चर्चांना थंड प्रतिसाद देणाऱ्या काँग्रेसवर अखेर आमदार विजय सरदेसाई यांच्यासमोर मैत्रीचा 'हात' पुढे करण्याची वेळ आली आहे. काँग्रेसच्या थंड प्रतिसादानंतर 'एकला चलो रे' असे म्हणत सरदेसाई यांनी 'जिथे गाव तिथे मी' या संकल्पनेच्या माध्यमातून पक्षाचे कार्य तळागाळात नेण्यास सुरुवात केली होती.
गोवा फॉरवर्डचा विस्तार काँग्रेससाठी मारक ठरू शकतो, असे दिसून आल्यानंतर काँग्रेसनेत्यांना सरदेसाईंशी राजकीय चर्चा करावी लागली. मात्र भाजपविरोधी आघाडीत गोवा फॉरवर्डला स्थान देण्याबरोबर पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण असे दोन पर्याय काँग्रेसने सरदेसाईंसमोर ठेवले. मात्र, सरदेसाई यांनी या दोन्ही प्रस्तावांवर मौन बाळगल्यामुळे आता काँग्रेसवर वाट पाहण्याची वेळ आली आहे.
भाजपविरोधी आघाडीत काँग्रेससोबत हात मिळवणी करण्यासाठी गोवा फॉरवर्ड गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रयत्न करत आहे. मात्र, काँग्रेसकडून त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. सरदेसाई यांनी प्रत्येक मतदारसंघाचा दौरा करत त्या-त्या मतदारसंघातील विषय घेण्यास सुरुवात केली आहे. या संकल्पनेचा जास्त फटका भाजपपेक्षा काँग्रेसला बसेल असेच काहीसे वातावरण तयार झालेले असताना काँग्रेस पक्षाने आता सरदेसाई यांच्यासमोर आघाडीचा हात पुढे केला आहे.
गोवा प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष एम. के. शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस आणि स्वतः शेख यांनी गोवा फॉरवर्डच्या मुख्यालयात विजय सरदेसाई यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली; मात्र त्यातून कोणताही ठोस निर्णय किंवा सहमती झाली नाही.
गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेस यांच्यातील संबंध गेल्या काही महिन्यांतच नव्हे, तर २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपासूनच चढ-उताराचे राहिले आहेत. निवडणुकीनंतर भाजपविरोधी मतांची एकजूट व्हावी म्हणून सरदेसाई यांनी गोवा फॉरवर्ड काँग्रेसमध्ये विलीन करण्याची तयारी दाखविल्याचा दावा अनेकदा केला होता. मात्र, काँग्रेस नेतृत्वाकडून त्यावर कोणताही निर्णय झाला नाही.
उलट चर्चा, समित्या, पक्षश्रेष्ठी आणि प्रक्रियेतच अडकून राहिल्या, अशी टीका सरदेसाई सातत्याने करत आले आहेत. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी, नेतृत्वबदल आणि आमदारांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांमुळे गोवा फॉरवर्डने काँग्रेसशी सुरू असलेल्या चर्चा स्थगित केल्या होत्या.
सरदेसाई यांनी काँग्रेससमोर 'हॅटट्रिक ऑफ डिफेक्शन'चा मुद्दा उपस्थित करून, निवडणुकीनंतर पुन्हा पक्षांतर झाले तर युतीचा काय उपयोग, असा सवालही केला होता.
आघाडीची चर्चा थांबल्यानंतर विजय सरदेसाई यांनी 'जिथे गाव, तिथे मी' मोहिमेला सुरुवात केली. या मोहिमेतून गोवा फॉरवर्डने गावोगावी संघटन मजबूत करण्यावर भर दिला.
स्थानिक प्रश्न, गोमंतकीय अस्मिता आणि भाजपविरोधी भूमिका या मुद्द्यांवर पक्षाने पुन्हा तळागाळात संपर्क वाढविला. या मोहिमेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे काँग्रेसवर राजकीय दबाव वाढल्याची चर्चा सुरू झाली.
एम. के. शेख यांनी स्पष्ट केले की, काँग्रेसने गोवा फॉरवर्डला कोणताही अधिकृत प्रस्ताव दिलेला नाही. मात्र भाजपविरोधी आघाडीत सहभागी होणे किंवा गोवा फॉरवर्डचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण या दोन्ही विषयांवर चर्चा झाली आहे. सरदेसाई यांचा प्रस्ताव असेल तर तो पक्षश्रेष्ठींसमोर ठेवण्यात येईल. स्थानिक पातळीवर अंतिम निर्णय होऊ शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसने प्रादेशिक पक्षांशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले असले तरी आम आदमी पक्षाबाबतचा अंतिम निर्णय दिल्लीतील केंद्रीय नेतृत्व घेणार असल्याचे शेख यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आप आणि इतर प्रादेशिक पक्ष एकाच आघाडीत येणार की स्वतंत्र समीकरणे तयार होणार, याकडे आता राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.
गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पक्षातील आपचा निर्णय दिल्लीत...
काँग्रेसने प्रादेशिक पक्षांशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले असले तरी आम आदमी पक्षाबाबतचा अंतिम निर्णय दिल्लीतील केंद्रीय नेतृत्व घेणार असल्याचे शेख यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आप आणि इतर प्रादेशिक पक्ष एकाच आघाडीत येणार की स्वतंत्र समीकरणे तयार होणार, याकडे आता राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.
गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पक्षातील युतीची चर्चा प्रगत टप्प्यात पोहोचल्याचे 'आप'चे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी जाहीर केले आहे. शिक्षण, आरोग्य आणि भ्रष्टाचाराविरोधी मुद्द्यांवर दोन्ही पक्षांचे विचार जुळत असल्याचेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे. अलीकडेच विजय सरदेसाई, अमित पाटकर आणि आमदार व्हेंझी व्हिएगस एकत्र आल्याने विरोधी एकजुटीच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे.