पणजी : पुढारी वृत्तसेवा
पर्वरी उड्डाणपूल वाहतुकीस खुला केल्यावर २४ तासांत दोन जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच उड्डाणपुलाची सुरक्षा, नियोजन व वाहतूक व्यवस्थेबाबत स्वतंत्र आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणीही केली.
उड्डाणपुलाचे उद्घाटन मोठ्या दिमाखात करण्यात आले; मात्र त्यानंतर दुचाकींना प्रवेशबंदी करण्याची वेळ का आली, असा प्रश्नही चोडणकर यांनी उपस्थित केला. उद्घाटनापूर्वीच सुरक्षा व वाहतुकीशी संबंधित बाबींची योग्य तपासणी झाली होती का, याचे उत्तर सरकारने जनतेला द्यावे.
त्या दोन मृत्यूंच्या कारणांबाबत आपण कोणताही निष्कर्ष काढत नाही. मात्र रस्त्याची रचना, वाहतूक प्रवाह, दिशादर्शक फलक, प्रकाशयोजना, प्रवेशमार्ग आणि वेग नियंत्रण यांसह सर्व बाबींची चौकशी झाली पाहिजे, असेही चोडणकर यांनी सांगितले.
कोट्यवधी रुपये खर्च झालेल्या या प्रकल्पाचा वाहतूक अभ्यास, सुरक्षा मूल्यांकन आणि डिझाइन अहवाल जनतेसमोर आणावेत, तसेच निष्काळजीपणा किंवा अपुरे नियोजन आढळल्यास जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी काँग्रेसने केली. साडे सहाशे कोटींच्या पुलाचे काम करताना प्रशासनाने कोणतीही खबरदारी घेतलेली नाही. त्यासोबतच या पुलाचे उद्घाटन करण्यापूर्वी संभाव्य धोकेही लक्षात घेण्यात आले नसल्याचे ते म्हणाले.
जबाबदारीही स्वीकारा
उड्डाणपूल प्रकल्पाचे श्रेय घेणार असाल तर त्याची जबाबदारीही स्वीकारा. केवळ उद्घाटनाचे श्रेय घेऊन अडचणी निर्माण झाल्यावर जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलता येणार नाही, असेही ते म्हणाले.