पणजी : पुढारी वृत्तसेवा
आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी (आरजीपी) एकत्रित लढणार आहे. त्याला शनिवारी तत्त्वतः सहमती देण्यात आली आहे. भाजपविरोधी मतांचे विभाजन टाळण्यासाठीची ही रणनीती आहे. काँग्रेस आणि आरजीपीच्या आघाडी समित्यांमध्ये तब्बल साडेतीन तास चाललेल्या बैठकीत गोव्यातील सद्य राजकीय परिस्थिती, भाजप सरकारचे अपयश आणि राज्यासमोरील गंभीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.
दोन्ही पक्षांनी मान्य केले की, भाजपविरोधी मतांची विभागणी ही भाजपच्या राजकीय फायद्याचे प्रमुख कारण ठरली आहे. त्यामुळे २०२७ मध्ये ही पुनरावृत्ती होऊ न देता भाजपविरोधी शक्तींना एकत्र आणण्याच्या दिशेने काँग्रेस आणि आरजीपीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ही केवळ आघाडी नाही; तर ही गोवा वाचवण्यासाठीची लढाई आहे, असे चोडणकर म्हणाले.
गोव्याची जमीन, अस्मिता, पर्यावरण, सांस्कृतिक वारसा, रोजगार आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण हा या राजकीय सहकार्याचा केंद्रबिंदू असेल. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, गोवा वाचवणे आणि गोमंतकीयांच्या हितांचे रक्षण करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असेल. जनतेला बदल हवा आहे. २०२७ मध्ये भाजपविरोधी मतांची विभागणी होऊ देता कामा नये.
चोडणकर म्हणाले की, ही आघाडी केवळ निवडणुकीतील आकडेमोडीसाठी नाही. ही गोवा वाचवण्यासाठीची राजकीय एकजुट आहे. भाजपविरोधी मतांची विभागणी झाल्याचा फायदा भाजपला दीर्घकाळ मिळत आला आहे. २०२७ मध्ये ही चूक पुन्हा होऊ देणार नाही. २०२७ ची निवडणूक ही गोव्याच्या भवितव्याची निर्णायक लढाई असेल.
भाजपविरोधी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. त्या मतांची विभागणी रोखून त्यांना एकत्रित करण्यासाठी काँग्रेस आणि आरजीपी पूर्ण ताकदीने काम करतील. चोडणकर म्हणाले, आमच्यासाठी पक्षीय स्वार्थापेक्षा गोव्याचे हित सर्वोच्च आहे. गोमंतकीयांच्या जमिनींचे संरक्षण, पर्यावरणाचे रक्षण, रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि गोव्याची अस्मिता जपणे यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.
जागावाटप आणि इतर संघटनात्मक बाबींवर पुढील काळात चर्चा सुरू राहील. पुढील चर्चेत परस्पर सन्मान, राजकीय परिपक्वता आणि लवचिकतेने निर्णय घेतले जातील. आमची एकमेव लाल रेषा म्हणजे गोव्याचे हित. काँग्रेसच्या शिष्टमंडळात गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, कार्याध्यक्ष एम. के. शेख आणि दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियतो फर्नांडिस यांचा समावेश होता.
आरजीपीच्या शिष्टमंडळात राष्ट्रीय अध्यक्ष व सांत आंद्रेचे आमदार विरेश बोरकर, प्रदेशाध्यक्ष शविना नाईक शिरोडकर आणि आघाडी समन्वय समितीचे अध्यक्ष अमोल नवलकर, तसेच दोन्ही पक्षांच्या आघाडी समित्यांचे सदस्य सहभागी झाले होते.