पणजी : अनिल पाटील
राष्ट्रीय महामार्ग ६६ वर पणजी जवळील पर्वरी येथे उभारण्यात येणाऱ्या नियोजित उड्डाणपुलाच्या कामासाठी पर्वरी जुना बाजार जंक्शन व तीन बिल्डींग जंक्शनवरील वाहन वाहतूक आज (सोमवार) १२ ऑगस्ट सकाळी ६ वाजल्यापासून सर्विस रोडवरून वळविण्यात आली आहे. ही वाहतूक चाचणी असून, ती यशस्वी झाल्यास उद्या १३ ऑगस्ट पासून प्रत्यक्ष उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे. आजची चाचणी यशस्वी झाली आहे, असा पोलिसांचा दावा असून वाहतूक कोंडीमुळे मात्र वाहन चालक आणि प्रवाशांचे हाल होत आहेत.
सरकारने या उड्डाण पुलाचे काम लवकरात लवकर हाती घेण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलले आहे. ७ ऑगस्टपासूनच पुलाचे काम हाती घेण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. पण पोलिसांनी विशेषत: महामार्गावरील वाहन वाहतूक व्यवस्थापनाचा प्रश्न उपस्थित केल्यामुळे हे काम पुढे ढकलण्यात आले होते. आज सोमवारी सकाळी सहापासून दिवसभर पुलाच्या कामासंदर्भात महामार्गावरील वाहन वाहतूक व्यवस्थापनाची प्रात्याक्षिक चाचणी सुरू आहे.
दोन्ही जंक्शनची वाहतूक सर्व्हिस रोडवर वळली आहे. यासाठी पर्वरी जुना बाजार जंक्शनजवळ गिरीच्या बाजूने दोन्हीकडे सर्व्हिस रोडवर प्लास्टिक अडथळे आणि काँक्रिट घालून डायर्व्हजन फलक लावले आहेत. दोन्ही बाजूला वाहतूक आणि पर्वरी पोलीस स्थानकाचे पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचारी कंत्राटदारांचे कर्मचारी, कामगार उभे असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
या पर्वरी उड्डाणपुलाच्या कामासाठी महाराष्ट्रातून पत्रादेवी मार्गे म्हापशाकडे येणारी अवजड वाहन वाहतूक बांदा, दोडामार्ग ते डिचोली या मार्गावरून वळविण्यात आली आहे, तर दक्षिण गोव्यातून पणजीकडे येणारी वाहतूक त्याच मार्गे पुन्हा वळवली आहे. तसेच चोर्लाघाट मार्गे म्हापसा पणजीकडे मार्गावर येणारी वाहतूक साखळी-माशेल मार्गे वळवली आहे. या संदर्भातील अधिसूचना राज्य सरकार तसेच सिंधुदुर्ग व बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांद्वारे आज जारी केली आहे. राज्य सरकारकडून याबाबतीत सिंधुदुर्ग व बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना शनिवारी पत्रे पाठवण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस उपाध्यक्ष उपाक्षिक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी दिली आहे.