पणजी : पुढारी वृत्तसेवा
कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात काल अकस्मात टाकलेल्या व्यापक छाप्यात कैद्यांच्या विविध खोल्यांमधून ४८ मोबाईल संच तसेच चार्जर, पॉवर बँक, ब्ल्यूटुथ इअरबडस्, गांजा, चरस व तंबाखूही जप्त करण्यात आला.
सुरक्षेतील त्रुटींवर उच्च न्यायालयाच्या देखरेखीच्या पार्श्वभूमीवर सर्व चार्जिंग पॉईंट्स तात्काळ काढून टाकण्यात आले. या घटनेमुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्था, अंतर्गत देखरेख आणि प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
तुरुंग महानिरीक्षक चौरासिया यांच्या निर्देशानुसार अधीक्षक हरिष मडकईकर व अधीक्षक विश्राम बोरकर तसेच तुरुंग अधीक्षक सुचेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कैद्यांच्या खोल्यांची तपासणी केली. सुमारे १५० हून अधिक पोलिस या तपासणीच्या कामासाठी वापरण्यात आले.
म्हापसा पोलीस निरीक्षक नविन देसाई, पीआय निखिल पालेकर, पीआय संजीत कांडोलकर, तसेच कोलवाळा पोलिस निरीक्षकही या कारवाईत सहभागी होते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या छाप्यात गोवा पोलिस व आयआरबीच्या गोवा सशस्त्र पोलिस दलासह सुमारे १५० ते २०० पोलिस कर्मचारी सहभागी होते.
सकाळी सुरू झालेली ही कारवाई अनेक तास चालली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्वतः कारागृह परिसरात उपस्थित राहून छाप्याचे नेतृत्व व देखरेख केली. छाप्यात धूम्रपानासाठीचा तंबाखू, चुना मिसळलेला खाण्याचा तंबाखू, सिगारेट पाकिटे, तसेच गांजा आणि चरससारखे अमली पदार्थही आढळून आले.