मडगाव : पुढारी वृत्तसेवा
चर्चच्या धर्मगुरूंशी चर्चा करण्यासाठी तब्बल १७ पोलिसांची फौज घेऊन चर्चमध्ये प्रवेश करण्याचा प्रकार कोलवा पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांच्या चांगलाच अंगलट आली आहे. पोलिस निरीक्षकाच्या या कृत्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याने नागरिकांनी पोलिस स्थानकावर धडक दिली.
विक्रम नाईक यांची ताबडतोब बदली करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच नाईक यांची त्वरित बदली न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलकांच्या दबावामुळे सायंकाळी उशिरा नाईक यांची बदली करण्यात आली.
अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिस अधीक्षक संतोष देसाई यांच्यासह उपाधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांना कोलवा पोलिस स्थानकावर धाव घ्यावी लागली. आमदार व्हेन्जी व्हिएगस, युवा नेते वॉरन आलेमाव यांनी यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले होते.
विक्रम नाईक हे पोलिस फौजफाट्यासह धर्मगुरूंची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यांच्या या कृतीमुळे नागरिकांचा संताप उफाळून आला. मंगळवारी शेकडो नागरिकांनी थेट कोलवा पोलिस स्थानकावर मोर्चा नेत त्यांच्या तत्काळ बदलीची जोरदार मागणी केली.
बदलीचे आदेश असूनही नाईक अद्याप पदावरच कसे, असा संतप्त सवाल उपस्थित करत सायंकाळपर्यंत नवीन निरीक्षकाची नियुक्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. निरीक्षक नाईक हे गणवेशात आणि पोलिस ताफ्यासह चर्चमध्ये दाखल झाले होते. या घटनेमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली.
पोलिसांचा हा 'दवाव तंत्राचा' प्रकार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. नाईक हे कोलवा येथील प्रभाग क्र. ३ मधील एका बिल्डरच्या रॉ व्हिला प्रकल्पाला पाठराखण करत असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला. या प्रकरणात संबंधित बिल्डरविरुद्ध तत्काळ एफआयआर दाखल करण्याची मागणीही करण्यात आली.
पोलिस निरीक्षकांनी आपल्या पदाचा गैरवापर करून एका खासगी प्रकल्पाला संरक्षण देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत त्यांच्या निलंबनाची ठाम मागणी करण्यात आली. मोर्चात आमदार व्हेंझी व्हिएगस, वॉरेन आलेमाव यांच्यासह सुमारे १०० हून अधिक नागरिक सहभागी झाले होते.
आंदोलकांनी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक संतोष देसाई आणि उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांना थेट जाब विचारत, बदलीचे आदेश असूनही नाईक अद्याप पदावर कसे, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला. पोलिस प्रशासनाच्या या विलंबामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोपही आंदोलकांनी केला.
आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी हा मुद्दा यापूर्वीच मुख्यमंत्र्यांसमोर आणि विधानसभेत मांडण्यात आला आहे. बदलीचा आदेश असूनही निरीक्षक अद्याप पदावर राहणे हे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह आहे. निरीक्षक विक्रम नाईक यांच्या तत्काळ निलंबन आणि बदलीची मागणी केली.
प्रकल्प विकासकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
पोलिस अधीक्षक संतोष देसाई यांनी आंदोलकांना निरीक्षक नाईक यांची बदली सायंकाळपर्यंत केली जाईल, असे आश्वासन दिल्याचे व्हिएगस यांनी सांगितले.
तसेच, संबंधित रो व्हिला प्रकल्प विकसित करणाऱ्या गुप्ता यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहितीही देण्यात आली. निरीक्षक नाईक यांनी आपल्या कृतीबाबत माफी मागितल्याची पुष्टीही करण्यात आली आहे.