पणजी ः आयआयटीसारख्या शैक्षणिक प्रकल्पाला गोवा सोडून इतर कुठेही विरोध होताना दिसत नाही. मात्र, 100 टक्के साक्षर असलेल्या गोव्यात नेमका कशासाठी आणि का विरोध होतो, हे समजण्यास मार्ग नाही. गोवेकरांनी आपली मनोवृत्ती बदलावी व आयआयटीला विरोध करणे बंद करावे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी व्यक्त केली.
पर्वरी येथील मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांनी कोडार-बेतोडा फोंडा येथे होऊ घातलेल्या आयआयटी प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, यापूर्वीही गोव्यात आयआयटीला काही ठिकाणी विरोध झालेला आहे. मात्र, हा विरोध नेमका का आणि कशासाठी हे विरोध करणार्यांना माहीत नसावे. कुणीतरी सांगतो म्हणून विरोध केला जातोय, ही गंभीर बाब आहे. गोव्यात चांगले राष्ट्रीय प्रकल्प येऊ नयेत यासाठी विरोध करणारे काही लोक गोव्यात आहेत आणि ते स्थानिकांना म्हणजेच ज्यांना काही माहिती नसते त्यांना चिथावतात, स्थानिकांनी अशा अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.
गोव्याचे लोकायुक्तपद खाली आहे, याची माहिती आपल्याला आहे. लवकरच योग्य ती प्रक्रिया करून नवे लोकायुक्त नियुक्त केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.