पणजी : बंदर खात्याच्या अंतर्गत येत असलेल्या ‘नदी परिवहन विभागा’चे नामांतर करत याला अंतर्गत जलमार्ग (इनलँड वॉटरवेज) विभाग असे नाव दिले आहे. या नाव बदलामागील हेतू विभागाचे कार्यक्षेत्र अधिक स्पष्ट करणे व अंतर्गत जलमार्गांच्या विकासावर भर देणे हा असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांची बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील जलमार्गांचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करून जलवाहतूक सुलभ करण्याच्या द़ृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे. नाव बदलामुळे विभागाची कार्यमर्यादा व द़ृष्टीकोन अधिक व्यापक होईल. पर्वरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यासाठी 2,400 चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन हस्तांतरित करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या भवनाच्या उभारणीसाठी जागा निश्चित झाल्याने अनुसूचित जाती-जमातींसाठी सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवण्यासाठी एक केंद्र उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी डॉ. आंबेडकर यांचे कार्य आणि विचार यांचा प्रचार व प्रसार होण्यासाठी उपयुक्त सुविधा निर्माण केल्या जातील. या निर्णयामुळे गोव्यातील दलित समाजाच्या दीर्घकालीन मागणीची पूर्तता होणार आहे. राज्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करता काही हिंस्त्र श्वानांच्या प्रजातींवर बंदी घालणे आवश्यक आहे. अनेक प्रकरणांमध्ये या प्रजातींच्या श्वानांनी हल्ले करून अनेकांना गंभीर जखमी केले आहे. त्यामुळे ‘प्राणी संवर्धन, पाळीव प्राणी नियंत्रण व भरपाई विधेयक 2025’ केवळ प्राणी नियंत्रणासाठी नव्हे, तर सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे.
सरकारच्या ‘प्राणी संवर्धन, पाळीव प्राणी नियंत्रण व भरपाई विधेयक 2025’ आगामी अधिवेशनात सादर करण्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. राज्यात वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पिटबुल, रॉटवायलर यांसारख्या हिंस्त्र श्वान प्रजाती आणि प्रजननावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी ‘गोवा प्राणी संवर्धन, पाळीव प्राणी नियंत्रण व भरपाई विधेयक, 2025’ आगामी विधानसभेच्या अधिवेशनात मांडले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. यांनी दिली.
अलीकडेच गोव्यातील ताळगाव, मांद्रे, म्हापसा, बेतालभाटी याठिकाणी कुत्र्यांनी हल्ला केल्याने दोघांचा मृत्यू तर चौघांना जखमी केले होते. त्यामुळे हिंस्त्र जातींच्या कुत्र्यांवर बंदी आणावी, अशी मागणी होत होती.
पिटबुल टेरियर, टोसा इनू, अमेरिकन स्टॅफोर्डशायर टेरियर या जाती (मिश्र आणि क्रॉस ब्रीड्ससह), फिला ब्रासिलिरो, डोगो अर्जेंटिनो, अमेरिकन बुलडॉग, बोअरबोएल, कांगल, सेंट्रल एशियन शेफर्ड डॉग (ओव्हचर्का), कॉकेशियन शेफर्ड डॉग (ओव्हचर्का), दक्षिण रशियन शेफर्ड डॉग (ओव्हचार्क), टोर्नजॅक, जपानी टोसा, अकिता, मास्टिफ्स (बोअरबुल्स), रॉटविलर, टेरियर्स, रोडेशियन रिजबॅक, वुल्फ डॉग, कॅनॅरिओ, मॉस्को गार्ड डॉग, कॅन कॉर्सो.
* गोवा वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरसह 170 पदांवर 3 वर्षांसाठी कंत्राटी भरती
* दंत महाविद्यालयात डॉक्टरांच्या 10 कंत्राटी पदांना मान्यता
* कारखाना व बाष्पक दुरुस्ती विधेयकाला मान्यता
* अभियोक्ता संचालनालयात 13 पदांना मान्यता
* एनसीसी या स्वतंत्र विभागाची स्थापना
* पर्यावरण व हवामान बदल खात्यात वैज्ञानिक अधिकारी पदांना मान्यता