पणजी : यंदाच्या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हलच्या धमाकेदार आणि यशस्वी आयोजनानंतर केवळ इतर राज्य नव्हे, तर देशही गोव्याच्या या पुढाकाराचे अनुकरण करतील, यात शंका नाही. सर्वात प्रभावशाली पर्पल फेस्टिव्हलमुळे राज्यातील शिक्षण, व्यवसाय, कार्यालये यामध्ये दिव्यांगांसाठी समान हक्क अबाधित राहण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून मी ग्वाही देतो, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.
2025 च्या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हलच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, विशेष ऑलिम्पिक अध्यक्षा मल्लिका नड्डा, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मंत्री सुभाष फळदेसाई, खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार राजेश फळदेसाई, उल्हास तुयेकर, आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, संचालिका वर्षा नाईक, सचिव प्रसन्ना आचार्य, ताहा हाझिक, आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, या महोत्सवामुळे राज्यात एका नव्या क्रांतीला सुरूवात झाली असून जरी महोत्सवाची सांगता होत असली, तरी खर्या अर्थाने दिव्यांगांच्या समान हक्क आणि न्यायाची चळवळ सुरू झाली आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सर्व सहकारी आणि मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या फेस्टिव्हलमुळे राज्यात ‘पर्पल अर्थव्यवस्थेला‘ चालना मिळाली आहे. तसेच गोव्यासह संपूर्ण देशभरात सर्वसमावेशकतेला प्राधान्य देऊन ती रुजवण्यात महत्त्वाचा प्रभाव पडला आहे. जागतिक पातळीवर झालेल्या जनजागृती आणि प्रभावामुळे आता राज्यातील शाळा, शिक्षण संस्था, खाजगी आणि सरकारी कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था, परिवहन अशा सर्वच ठिकाणी दिव्यांगांना समान हक्क देण्यासाठी राज्य सरकार बांधील असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल हा केवळ उत्सव नसून विशेष आणि सामान्यांमध्ये मैत्री भाव आणि समानता जपून ठेवण्यासाठी एक महत्त्वाचा दुवा आहे. गोव्याने पुन्हा एकदा दाखवून दिले की आपण आकाराने जरी लहान असलो तरी सर्व समावेश शकते मध्ये जागतिक नेतृत्व करण्याची ताकद गोव्यात आहे. या महोत्सवाचे यशस्वी आयोजन करणार्या मंत्री सुभाष फळदेसाई यांचे कौतुक करावेच लागेल, असेही ते म्हणाले.
दिव्यांगांच्या विकासासाठी आणि सर्वसमावेशक समाजनिर्मितीसाठी गोव्याने उचललेले हा विडा आता जागतिक स्तरावर पोहोचला आहे. पर्पल फेस्टिव्हलमुळे संपूर्ण जग दिव्यांगांच्या हक्काच्या चळवळीत पुढे सरसावले आहे. दिव्यांगांवर दया दाखवण्याऐवजी त्यांना समान वागणूक देणे गरजेचे आहे. यासाठी राज्य सरकार पाठिशी खंबीरपणे उभे असेलच, असा विश्वास असल्याचे प्रतिपादन केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केले.
यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये 300 हून अधिक उपक्रम पार पडले. दिवसाकाठी फेस्टिवलच्या सर्व स्थळांवर 50 हजारहून अधिक तर चारही दिवसात अंदाजे 2 लाख जणांनी महोत्सवात विविध ठिकाणी सहभाग घेतला होता. दरम्यान, कलाकार, दिव्यांग व्यावसायिक, विशेष शाळा आणि खाजगी कंपन्यांना मिळून 250 हून अधिक स्टॉल्स महोत्सवात उभारण्यात आले होते.