पणजी : सिद्दीकी प्रकरणाचे अपडेटस् आपल्याला वेळोवेळी पोलिस खात्याकडून देण्यात येत आहेत. आपण चोरांनी केलेल्या आरोपांवर विश्वास ठेवणार का?, असा प्रतिप्रश्न मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उपस्थित करून लवकरच सिद्दीकीला अटक करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सोमवारी इन्स्टिट्यूट ऑफ मिनेझिस ब्रांगाझा सभागृहात एका कार्यक्रमासाठी आले असता, पत्रकारांनी त्यांना या प्रकरणातील आरोपी सिद्दीकी खान याने जारी केलेल्या एका व्हिडीओत आमदार ज्योशुआ यांचे नाव घेतल्यासंदर्भात प्रतिक्रिया विचारली होती. राज्यात गाजणारे सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान प्रकरण दिवसेंदिवस गुंतागुंतीचे बनत आहे. सिद्दीकीने व्हायरल केलेल्या व्हिडीओत आमदार ज्योशुआ डिसोझा यांचे नाव घेतल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले असून काँग्रेसने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे, तर काँग्रेस आणि आपच्या शिष्टमंडळाने पोलिस महासंचालक आलोक कुमार यांची भेट घेत त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. गोवा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस कोठडीतून 13 डिसेंबर रोजी पोलिसाच्या मदतीने पळालेल्या सिद्दीकीने एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल करत आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी आपल्यावर दबाव आणत ‘तुझी जमीन माझ्या माणसाच्या नावावर कर’ असे म्हटल्याचा दावा केला आहे. त्यांना पोलिस मदत करत असल्याचे त्याने म्हटले असून यात पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्यासह पोलिस उपअधीक्षक, एसआयटी, आयआरबीमधील 12 पोलिस सहभागी आहेत.’ या वक्तव्यामुळे पोलिस खातेही अधिक संशयाच्या घेर्यात सापडले आहे.
सिद्दीकीने सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमुळे राजकीय व्यक्ती, पोलिस आणि गुन्हेगार यांचे साटेलोटे असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग आला असून विरोधक आक्रमक झाले आहेत. सोमवारी दिवसभर त्यांनी सरकारवर जोरदार टीका करत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी राजीनामा द्यावा आणि राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलिस महासंचालक आलोक कुमार यांची भेट घेत 13 डिसेंबर रोजी गुन्हा अन्वेषण विभागाच्या कार्यालयातील सर्व सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करावे, अशी मागणी केली आहे.