दाबोळी : पुढारी वृत्तसेवा
'स्वयंपूर्ण गोवा'च्या माध्यमातून प्रत्येक महिलेला स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकार 'कौशल्य भारत' या उपक्रमाअंतर्गत पुढाकार घेत आहे. गोव्यातील स्थानिकांचे विणकाम कला यातून पारंपरिक कुणबी वस्त्रांचे रूप महिला संसाधन केंद्रात पाहायला मिळाले. पारंपरिक पद्धतीच्या वेषभूषेला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी या भवनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
दाबोळी चिखली येथे पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या 'महिला भवन' व 'महिला संसाधन' केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर,
मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, चिखलीच्या उपसरपंच ऐश्वर्या कोरगावकर, कुणबी वस्त्राभूषणांची कलाकार वमा डिमेलो, चिखली व बोगमाळोचे पंच सदस्य, दाबोळी भाजप सचिन चौगुले, मुकुंद त्रिवेदी व इतर मान्यवर उपस्थित होते.
सरकार विविध मार्गे महिलांना सक्षम करण्यासाठी आर्थिक सहकार्य करत असून, याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले आहे. डॉ. सावंत व इतरांच्या हस्ते कुणबी वस्त्र पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाला सरपंच कमलाप्रसाद यादव हे गैरहजर होते. काहींनी नुकताच त्यांना विधानसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह केला होता. त्यामुळे त्यांची अनुपस्थितीत चर्चेचा विषय बनला.