पणजी : पुढारी वृत्तसेवा
प्राथमिक शिक्षण विद्यार्थ्यांच्या जीवनाचा पाया घडवतो. राष्ट्र उभारणीसाठी देशप्रेमी नागरिक घडायला हवेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांनी देशप्रेमी व संस्कारी विद्यार्थी घडवावेत, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
पणजी येथे आयोजित एका १४ ऑगस्ट रोजी कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा कर्मचारी निवड आयोगातर्फे निवडलेल्या २२२ सरकारी प्राथमिक शिक्षकांना नियुक्ती पत्रे प्रदान केली. यावेळी मच्छीमार खात्याचे मंत्री निळकंठ हळर्णकर, आमदार रुडाल्फ फर्नांडिस, शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, नियुक्त २२२ शिक्षकांपैकी बहुतांश महिला आहेत. महिला चांगल्या प्रकारे संस्कार घरामध्ये आणि शाळेमध्येही करू शकतात. आजचा दिवस हा देश विभाजन झालेला दिवस. आजच्या दिवशी देशाची फाळणी झाली.
पाकिस्तानातील हजारो हिंदूंच्या कत्तली करून त्यांचे मृतदेह भारतात रेल्वेने पाठवले गेले. हा इतिहास मुलांना शिकवण्याची गरज आहे. देशप्रेमाने भरलेले संस्कारमय नागरिक निर्माण होण्याची गरज असून, हे काम शिक्षक चांगल्या पद्धतीने करू शकतात, असे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्रींना झाली मराठी शाळेची आठवण प्राथमिक शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जीवनाचे व शिक्षणाचे रोल मॉडेल असतात. हे महत्त्व शिक्षकांनी जाणून घ्यायला हवे. कारण एखाद्या व्यक्तीला प्राथमिक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक यांचीच आठवण राहत असते, असे सांगून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आपल्या मराठी प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षणाची माहिती यावेळी उपस्थितांना दिली.
कोकणी शाळांसाठी जे शिक्षक नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यातील काहींना कोकणी लिहायला जमत नसल्याचा गौप्यस्फोट करून शिक्षक जी भाषा शिकवतात त्यात त्यांना प्राविण्य हवेच, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ठणकावून सांगितले.
गोवा कर्मचारी भरती आयोगाने जे सरकारी प्राथमिक मराठी शाळांच्या शिक्षकांसाठी भरतीवेळी परीक्षेत दहा गुण मराठीसाठी होते. कोकणी माध्यमाच्या शिक्षकासाठी दहा गुणांचे कोकणी पेपर होते. त्यामुळे सरकारने मराठीवर अन्याय केलेला नाही. आपण कोकणी बोलतो, तसेच मराठीही शुद्ध बोलणे आजची गरज असल्याचे सांगून त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगली मराठी शिकवावी, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.