पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवी दिल्लीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची सदिच्छा भेट घेऊन गोव्याशी संबंधित काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली. यामध्ये गोव्यातील हेमरो युनिट लवकरात लवकर कार्यान्वित करणे, पणजीतील लष्करी व दंत रुग्णालयाचे अन्यत्र स्थलांतर करणे, तसेच राज्यात नवीन सैनिक शाळा मंजूर करणे या प्रमुख विषयांचा समावेश होता.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, हेमरो (हाय येंड मिल्ट्री रिपेअर अँड ओव्हरहाऊल) युनिट उभारणीसाठी गोव्यातील अधोरेखित जागेचा वापर करण्यासंबंधी प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. हे युनिट जर गोव्यात कार्यरत झाले तर राज्यात संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान, रोजगार व स्थानिक युवकांसाठी नव्या संधी उपलब्ध होतील. पणजी शहरात सध्या कार्यरत असलेले लष्करी आणि दंत रुग्णालय हे दोन्ही नागरिकांसाठी मर्यादित स्वरूपात खुले आहेत. या रुग्णालयांचे अन्यत्र स्थलांतर केल्यास त्यांची जागा सार्वजनिक उपयोगासाठी खुली होईल. त्यामुळे नागरिकांना सुविधा उपलब्ध होतील आणि शहरातील जागेचा योग्य उपयोग होईल, असा प्रस्ताव आहे.
मुख्यमंत्र्यांनी संरक्षण मंत्र्यांकडे राज्यात एक सैनिक शाळा मंजूर करण्याची मागणी केली. सध्या गोव्यात शैक्षणिकदृष्ट्या गुणवत्ता असूनही सैनिक शाळा उपलब्ध नाहीत. त्यामुळे गोमंतकीय विद्यार्थ्यांना देशसेवेसाठी तयार करण्याच्या दृष्टीने ही शाळा उपयुक्त ठरेल, असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राज्य सरकारकडून मांडण्यात आलेल्या प्रस्तावांची सकारात्मक दखल घेतली असून लवकरच संबंधित अधिकार्यांमार्फत कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गोव्याच्या निर्यातक्षमतेला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवी दिल्लीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. या भेटीत गोव्यातील कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी आवश्यक आधारभूत सुविधा निर्माण करण्यावर सविस्तर चर्चा झाली. विशेषतः गोव्यात ‘एपीडा’ (अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी काम करणारी संस्था) चे कार्यालय स्थापन करून त्याचे त्वरीत कार्यान्वित व्हावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. या प्रस्तावामुळे राज्यातील शेतकरी व उत्पादकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत संधी मिळणार असून, गोव्याच्या कृषी निर्यातीला मोठा चालना मिळेल, असा विश्वास डॉ. सावंत यांनी व्यक्त केला.