पणजी ः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला (गोमेकॉ) भेट देऊन आंदोलन करणार्या निवासी डॉक्टरांची भेट घेऊन डॉक्टरांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या. त्यामुळे डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतले व गोमेकॉतील आरोग्य उपचार सेवा सुरळीत झाली. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, अधीक्षक डॉ. राजेश पाटील, डॉ. मधू घोडकिरेकर व इतर डॉक्टरांच्या उपस्थितीत बैठक घेऊन आंदोलनावर तोडगा काढला.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना जाब विचारल्याच्या प्रकरणानंतर गोमेकॉच्या निवासी डॉक्टरांनी आंदोलन सुरू केले होते. सोमवारी यांना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांची साथ मिळाली होती. आज पुन्हा सकाळी निवासी डॉक्टरांनी आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे मुख्यमंत्री स्वतः त्यांना सामोरे गेले व त्यांच्यासोबत बैठक घेऊन बहुतांश मागण्या मान्य केल्या. डॉक्टरांसोबतच्या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले, डॉक्टरांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. सोमवारी आपण पणजीत बैठक घेऊन चर्चा केली होती. आज गोमेकॉ इस्पितळात येऊन डॉक्टरांशी चर्चा केली.
यापुढे गोमेकॉच्या पोलिस चौकीत एक पोेलिस उपनिरीक्षक तैनात केला जाईल. त्यासोबत 50 पोलिस ठेवले जातील. गोमेकॉच्या अंतर्गत भागांत व्हिडीओग्राफी आणि फोटोग्राफीला परवानगी नसेल. व्हीआयपी कल्चरल बंद होईल. इतरही काही मागण्या मान्य केल्यामुळे डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतले. याबद्दल आपण डॉक्टरांचे आभार मानतो, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.