CM Dr. Pramod sawant pudhari photo
गोवा

CM Dr Pramod Sawant | पक्षाचा आदेश असेल तर दिल्लीला जाण्यास तयार; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे स्पष्ट विधान

CM Dr Pramod Sawant | मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : पक्षाचा आदेश सदैव शिरोधार्ह

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
आपण भारतीय जनता पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे. पक्षाने आपल्याला ज्या-ज्या जबाबदाऱ्या दिल्या, त्या-त्या आपण पार पाडल्या आहेत. पक्षाला वाटले की आपण दिल्लीला जावे तर आपण त्याला नकार देणार नाही, असे विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी रात्री उशिरा एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले. त्यामुळे राज्यभर याबाबत राजकीय चर्चा रंगली आहे.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, आपण भाजपचा सदस्य, त्यानंतर युवा मोर्चा अध्यक्ष, त्यानंतर आमदार, सभापती व मुख्यमंत्री अशी विविध पदे भूषवली आहेत. पक्षाने आम्हाला जी जबाबदारी दिली ती आपण यशस्वीपणे सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जर पक्षाने येत्या काळामध्ये आपणास दिल्लीला जाण्याचा आदेश दिला तर आपण तोही पाळू.

मात्र सध्याच्या घडीला तरी दिल्लीला जाण्याबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही किंवा त्याबाबत कुठल्याच नेत्याने विचारणा केलेली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत गोव्याचे नेतृत्व कोण करेल हे भाजप ठरवेल, तर पक्षाचा विजय सुनिश्चित करणे ही त्यांची जबाबदारी आहे, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.

निवडणुका डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखालीच:
राज्यात ही राजकीय चर्चा जरी रंगली असली तरी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीनंतरच त्याबाबत अंतिम निर्णय होणार आहे. कारण येत्या विधानसभा निवडणुका या डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाणार असल्याचा भाजपच्या सूत्रांनी सांगितले आहे.

पक्ष देईल ती जबाबदारी घेऊ : डॉ. तवडकर
आपण २००० पासून भाजपचे काम करत आहे. पक्षाने ज्या जबाबदारी दिल्या त्या पाडल्या आता पक्षाने मोठी जबाबदारी दिली तर पक्षाचा आदेश पाळणे, अशी प्रतिक्रिया कला व संस्कृती मंत्री डॉ. रमेश तवडकर यांनी दिली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पक्षाने दिल्लीला जा म्हटले तर जाईन असे म्हटल्यानंतर पत्रकारांनी डॉ. तवडकर यांना सोमवारी पणजीत तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही मुख्यमंत्री होण्यास तयार आहात काय, असे विचारले असता तवडकर यांनी पक्ष देईल ती जबाबदारी आपण स्वीकारून, अशी प्रतिक्रिया दिली.

पूर्वी माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांना गोव्याचे मुख्यमंत्री असतानाच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रामध्ये संरक्षण मंत्री म्हणून नेण्यात आले होते. त्यानंतर २०१७ मध्ये गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एकदम कमी जागा मिळाल्या होत्या.

मात्र गोवा फॉरवर्ड आणि मगो या पक्षांचे नेते अनुक्रमे विजय सरदेसाई व सुदिन ढवळीकर यांनी जर मनोहर पर्रीकर यांना गोव्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून आणले जाते तर आपल्या पक्षासह तीन अपक्ष आमदारांचा पाठिंबा देऊन भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार गोव्यात स्थापन करण्याच्या तयारी दाखवली. त्यामुळे मनोहर पर्रीकर यांना केंद्रातून २०१७ च्या विधानसभा निवडणुकीनंतर गोव्यात आणण्यात आले होते. मुख्यमंत्री करण्यात आले होते. त्याचप्रमाणे विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिल्लीमध्ये नेण्याबाबत सध्या चर्चा रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT