पणजी : योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याची गरज आहे. राज्यातील शाळांनीही पुढाकार घेत रोज 15 मिनिटे विद्यार्थ्यांकडून योगासने करून घ्यावीत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्याचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्य सचिव डॉ. व्ही. कांदावेलू व अन्य अधिकारी उपस्थित होते.
ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे योग ही आरोग्य, शांती आणि आंतरिक संतुलनाला प्रोत्साहन देणारी जागतिक चळवळ बनली आहे. योग आपल्याला स्वतःशी, निसर्गाशी आणि जगाशी जोडतो. निरोगी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आपण या प्राचीन ज्ञानाचा जीवनशैली म्हणून स्वीकार करूया, असे आवाहनही त्यांनी केले. उद्घाटन सत्रानंतर मुख्यमंत्र्यांसह उपस्थित अधिकार्यांनी शेकडो विद्यार्थ्यांसोबत योगासने केली.
राज्यभरात सुमारे 15 हजार ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन आयोजित करण्यात आला. पतंजली, भारत स्वाभिमान, पद्मनाभ संप्रदाय, आयुर्वेदिक महाविद्यालय शिरोडा, क्रीडा प्रधिकारण आदी संस्थांसह शाळांतील विद्यार्थी व सरकारी कार्यालयातील कर्मचारी, नागरिक अशा सुमारे 4 लाख जणांनी योग दिनात सहभाग घेतला होता. मंत्री व आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगभर आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 साजरा होत आहे. लाखोे लोकांनी योगाचा स्वीकार केला आहे. योग हा आरोग्य, सौहार्द आणि शांतीचा जागतिक मार्ग बनला आहे. गोवा अशा उपक्रमांद्वारे निरोगीपणा आणि प्रतिबंधात्मक आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. पणजीत आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात राणे यांनी सहभाग घेतला.
केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि अक्षय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जुने गोव्यातील चर्च आणि कॉन्व्हेंटच्या लॉन्समध्ये ’एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग’ या थीमवर आयोजित योगासनात भाग घेतला. ते म्हणाले, योग ही भारताची अमूल्य अशी देणगी असून आरोग्य सुधारण्यासाठी योग लाभदायी ठरू शकतो, असे नाईक म्हणाले.
आदर्श मतदारसंघ होण्यासाठी आपल्याला निरोगी नागरिक असणे आवश्यक आहे. शारीरिक आणि बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी योग हा प्रभावी उपाय आहे. आरोग्य, आंतरिक शांती आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी योगाचा सराव करूया, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पर्वरी येथे आयोजित कार्यक्रमात सांगितले.